विशाल पाटील, प्रतिनिधी
Sada Sarvankar vs Amit Thackeray : मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या विधानसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासमोर विद्यमान शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचं तगडं आव्हान आहे.
अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार असल्यानं त्यांच्यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी अशी इच्छा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि सदा सरवणकर यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती आहे. या चर्चेनंतर सदा सरवणकर माघार घेणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उद्या (मंगळवार, 29 ऑक्टोबर) आहे. त्यापूर्वी सदा सरवणकर यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे. ते मंगळवारी (29 ऑक्टोबर) सकाळी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरताना सामना शाखेपासून भव्य रॅली काढत शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं स्वत: सरवणकर यांनी सांगितलं. त्याचबरोबर अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनच परवानगी मिळाली असल्याची महत्त्वाची माहिती सरवणकर यांनी दिली.
सदा सरवणकर अर्ज भरणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे माहीम मतदारसंघाता आता तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत हे निवडणुकीतील तिसरे महत्त्वाचे उमेदवार आहेत.
( नक्की वाचा : लोकसभेतील मैत्री विधानसभेत तुटली! मुंबईतील जागांवरुन शिंदे-ठाकरे, आमने-सामने )
प्रदीर्घ राजकीय कारकिर्द
सदा सरवणकर यांची राजकीय कारकिर्द तीन दशकांपेक्षा जास्त आहे. ते 1992 साली सर्व प्रथम मुंबई महापालिकेचे नगरसेवक बनले. महापालिकेच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद देखील त्यांनी सांभाळलं आहे. 2004 साली ते पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले होते.
2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं उमेदवारी न दिल्यानं त्यांनी बंडखोरी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण, त्या निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा स्वगृही परतले. ते गेली दोन टर्म सलग माहीमचे शिवसेना आमदार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर सरवरणकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.