'ईडीची कारवाई झाली तर, सत्तेत सहभागी होणार' अबू आझमी थेट बोलले

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

जुई जाधव 

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तूळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. आझमी यांच्याकडे 400 कोटीची बेनामी संपत्ती असल्याची तक्रार भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. ईडीसह मुंबई पोलिसांकडे ही तक्रार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारले असता त्यांनी सर्वांना चक्रावून सोडणारे वक्तव्य केले आहे. जर माझावर ईडीची कारवाई झाली, किंवा आपल्यावर दबाव टाकला गेला तर मी सत्तेत सहभागी होईन असे थेट वक्तव्य आझमी यांनी केले आहे. 

हेही वाचा - नाशिकचा उमेदवार कोण? मुख्यमंत्र्यांची रात्रभर खलबतं, कोणाचं नाव फायनल?

अबू आझमी नेमकं काय म्हणाले? 

ईडीची कारवाई झाली तर काय कराल या प्रश्नाला उत्तर देताना आझमी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जर माझ्यावर ईडीची कारवाई झाली, आणि दबाव टाकण्यात आला तर मी सत्तेत सामील होईन असे आझमी यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय  कोणाला जेलमध्ये जायची हौस आहे असंही ते म्हणाले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.  

'समाजवादी पक्ष सोडणार नाही' 

अबू आझमी यांनी नुकतीच रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली होती. त्यानंतर आझमी हे समाजवादी पक्ष सोडून राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र आपण समाजवादी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही असे आझमी म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांची रात्री 11 वाजता भेट घेतली. मात्र ती भेट माझ्या वैयक्तिक कामांसाठी होती असे आझमी यांनी स्पष्ट केले. अशाच भेटी या शिंदे, फडणवीस, शरद पवार यांच्याबरोबर ही होत असतात असेही ते म्हणाले. त्यामुळे मी राष्ट्रवादीत जाणार या फक्त अफवा असल्याचेही ते म्हणाले. 

रईस शेख नाराज असतील तर... 

दरम्यान समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख हे नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीतूनच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता. जर शेख नाराज असतील तर त्यांनी पक्षाची बैठक बोलवावी. त्यात त्यांनी त्यांचे म्हणणे मांडावे. माझ्या बद्दल काही आक्षेप असतील तर माझ्याशी बोलावे असेही आझमी म्हणाले. पक्षामध्ये काही मतभेद नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.   

Advertisement