नाशिक लोकसभेत महायुतीचा उमेदवार अजूनही निश्चित होत नाही. शिवसेना शिंदे गटाला ही जागा मिळेल अशी स्थिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनीही नाशिकमध्ये कोण उमेदवार असावा याचा आढावा घेतला. उमेदवार कोण असावा यासाठी रात्री उशिरापर्यंत खलबतं सुरू होती. या बैठकीत विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेले जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते उपस्थित होते. उमेदवार कोण असणार याची घोषणा पुढील दोन दिवसात केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवार कोण याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.
हेही वाचा - 'फडणवीसांना अटकेची भीती तर शिंदेंना...' राऊतांचा 'त्या' आरोपावर मोठा गौप्यस्फोट
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झालं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. या बैठकीत नाशिकची जागा ही शिवसेनाच लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दोन दिवसात उमेदवाराची घोषणा होईल असे ही त्यांनी सांगितले. सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचाराला लागावेत असे आदेशही त्यांनी यावेळी दिल्याचे गोडसे यांनी सांगितले. नाशिकचा तिढा सुटला असल्याचे सांगत, आता उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कामाला लागा असेही ते म्हणाले.
शिवसेनेचा उमेदवार कोण?
पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सर्वांनी एका मताने माझेच नाव सुचवल्याचा दावा हेमंत गोडसे यांनी केला आहे. याचा सकारात्मक विचार करून आपल्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल असे ही ते म्हणाले. गेल्या दहा वर्षापासून नाशिक लोकसभाचे प्रतिनिधित्व केले. यामुळे आपला जनसंपर्क चांगला आहे, असेही गोडसे म्हणाले. प्रचाराची एक फेरी पूर्ण केल्याचेही त्यांनी सांगितले.
समता परिषदेच्या बैठकीत काय झालं?
एकीकडे शिवसेना शिंदे गट नाशिक लोकसभेच्या तयारीला लागला आहे. अशा वेळी छगन भुजबळांनी नाशिकमध्ये समता परिषदेची बैठक बोलवली होती. या बैठकीत भुजबळांनीच नाशिक लोकसभेची जागा लढवावी असा आग्रह केला. मात्र आपण ही निवडणूक लढणार नाही असे भुजबळांनी पुन्हा एकदा स्पष्ट केला. त्यामुळे आता शिवसेनेकडून कोणाला मैदानात उतरवलं जाते ते पहावे लागेल.
महाविकास आघाडीचा उमेदवार मैदानात
दरम्यान महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेली आहे. ठाकरे गटाने इथे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी विजय करंजकर इच्छुक होते. त्यांनी प्रचारही सुरू केला होता. मात्र ऐन वेळी त्यांची उमेदवारी कट करण्यात आली. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी स्वत:ला प्रचारापासूनही दुर ठेवले आहे. तर दुसरीकडे महायुतीने आपला उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world