सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांविरोधात दंड थोपटले आहे. काँग्रेसच्या बंडखोर विशालांची ताकद आणखी वाढली आहे. कारण आरपीआयच्या जिल्हा कार्याध्यक्षांनी बंड करत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले विशाल पाटील यांच्यासाठी रिपाइं आठवले पक्षाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी बंड केलं आहे. अशोक कांबळे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
(हेही वाचा - माघार नाहीच! सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष उमेदवार; चिन्हही ठरलं!)
माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील यांनी देखील मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत आरपीआयच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली.
सांगलीत तिरंगी लढत
सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील, काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. विशाल पाटील यांच्या उमेदवारीमुळे ही लढत आणखी चुरशीची बनली आहे. मागील निवडणुकीत विशाल पाटील यांना पराभव झाला होता, त्यामुळे यंदा ते परतफेड करण्याच्या तयारीत आहेत. तर संजयकाका पाटील विजयाची हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. तर दोघांच्या भांडणाचा चंद्रहार पाटलांना कितपत फायदा होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.
(नक्की वाचा- सांगलीनंतर 'या' मतदारसंघातही मविआमध्ये बंडखोरी; आता ठाकरे काय करणार?)
विशाल पाटलांवर पक्षांतर्गत कारवाई होणार?
विशाल पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत पक्षशिस्त मोडली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर कारवाई होण्याची शक्यता आहे. येत्या 25 तारखेला पक्षाची बैठक होत आहे, त्यावेळी त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार की नाही याकडेही सर्वांचं लक्ष आहे.