Sangli Lok Sabha : महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा काँग्रेसनं प्रतिष्ठेची केली होती. विशाल पाटील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यात इच्छूक आहेत. काँग्रेस नेत्यांच्या जोरदार प्रयत्नानंतरही ही जागा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळाली आहे. विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याचे पडसाद काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे.
या प्रकरणामुळे महाविकास आघाडीच्या गटातील काळजी चांगलीच वाढली आहे. विशाल पाटील यांचं तिकीट डावलल्याचं काँग्रेसला महागात पडल्याचं दिसून येत आहे.
मविआच्या जागावाटपात काँग्रेसची कोंडी, महत्त्वाच्या जागा गमावल्या
विशाल पाटील वंचितच्या गटात?
विशाल पाटील यांचे बंधू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अकोला येथे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. अकोला येथील प्रकाश आंबेडकरांचं निवासस्थान यशवंत भवन येथे प्रमुख नेत्यांची चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार या चर्चेत प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. विशाल पाटील हे वंचितच्या पाठींब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धुळ्यात काँग्रेसची 'शोभा', 'परत जा' च्या घोषणांसह कार्यकर्त्यांचा राडा
1952 ते 2014 या कालावधीत सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. अगदी 1997 मधील आणिबाणीच्या काँग्रेसविरोधी लाटेतही सांगलीकरांनी काँग्रेसला साथ दिली होती. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा सांगली हा बालेकिल्ला होता. त्यामुळे काँग्रेसचं सांगलीशी भावनिक नातं देखील आहे. वसंतदादांचा हा गड जागावाटपाच्या वाटाघाटीमध्ये काँग्रेसनं गमावला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटील आता सांगलीतून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील.