Udayan Raje Bhosle Satara : भारतीय जनता पक्षानं सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं ही घोषणा केलीय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांची लढत होईल. उदयनराजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून गेले होते. त्यानंतर काही महिन्यातच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत.
अजित पवार गट होता आग्रही
सातारा लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गट देखील आग्रही होता. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय होण्यास उशीरा झाला असं मानलं जातंय. त्यानंतरही उदयनराजे भोसले यांनी प्रचाराला सुरूवात केली होती. त्यांनी मतदारसंघात अनेक ठिकाणी मेळावे घेतले होते. यामध्ये त्यांना त्यांचे चुलत भाऊ शिवेंद्रराजे भोसले यांचीही साथ मिळत होती. शिवेंद्रराजे भाजपाचे आमदार आहेत. तसं पाहता हे दोघंही दोघेही एकमेकाला शह देण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. पण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे दोनही राजे एकत्र आले आहेत.
दादा की काकी? रोहित पवारांचं 'ते' वक्तव्य अन् बारामतीत सस्पेन्स वाढला?
उदयनराजेंचा राजकीय प्रवास
छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपामधून केली होती. 1995 साली युती सरकार सत्तेत असताना ते भाजपा आमदार आणि काही काळ मंत्री देखील हते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009, 2014 आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले.
अजित पवार यांच्या महायुतीची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एन्ट्री झाल्यानंतर उदयनराजे यांच्या उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून ते दिल्लीत तीन दिवस मुक्काम ठोकून होते. त्यानंतर साताऱ्यात परतल्यानंतर त्यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली होती. आता अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून भाजपाकडून उदयनराजेंच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.