ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचं दिसून येत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संजीव नाईक आग्रही होते. त्यांनी प्रचारही सुरू केला होता. दरम्यान ही जागा शिवसेनेकडे गेल्याने भाजप पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे भाजपने संजीव नाईक यांचा प्रचार सुरूच आहे. नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्यानंतर संजीव नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. म्हस्के यांना उमेदवारी घोषित केल्यानंतरही संजीव नाईक मीरा-भाईंदरमधील विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित होते.
मीरा-भाईंदर या भागात नरेश म्हस्के यांचा संपर्क नसल्याचं सांगितलं जात आहे. ते या भागात फारसे फिरकले नसल्याने त्यांना तिकीट दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे ठाणे मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक यांच्या उमेदवारीची चर्चा होती. गेल्या सहा महिन्यांपासून सरनाईक आपल्या विधानसभा क्षेत्राव्यतिरिक्त इतर जागांवरही सक्रिय दिसून येत होतं. मात्र नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपबरोबरच शिंदे गटाचे नेतेही नाराज असल्याचं चित्र आहे.
नक्की वाचा - 'ऐनवेळी मला तिकीट नाकारलं हे माझ्यासाठी...'; भाजप खासदार राजेंद्र गावितांचं मोठं विधान
गुरुवारी ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमधील गणेश नाईक यांचे समर्थक गुरुवारी आक्रमक झाले. त्यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात निदर्शने केली आणि सामुदायिक राजीनामे दिले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि म्हस्के यांच्याविरोधात आरोपाच्या फैरी झाडल्या.