Shirur Lok Sabha 2024 : नेता की अभिनेता? 'शिरुर'चा गड कोण काबीज करणार?

अजित पवारांना शिरुर लोकसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली. यासाठी अजित पवार अखेरचे काही दिवस शिरुरमध्येच तळ ठोकून होते.

Advertisement
Read Time: 3 mins

सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आहेत. शरद पवार गटाकडून डॉ. अमोल कोल्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत. 

शिरूर लोकसभा मतदारसंघ मुळचा खेड लोकसभा नावाने ओळखला जाणारा मतदानसंघ 2009 साली विभाजन होऊन शिरूर लोकसभा मतदारसंघ या नावाने ओळखला जाऊ लागला. मूळचा शिवसेनेकडे असणाऱ्या या मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बाजी मारली. त्यावेळी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात 58 हजार 486 मतांनी विजय मिळवला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यातील सत्तासंघर्षाचा परिणाम या शिरूर लोकसभा मतदारसंघातही दिसून आला. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतरअमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत राहणे पसंत केलं. दुसरीकडे तगडा उमेदवार नसताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ही जागा महायुतीला सोडण्यास तयार नव्हती. अखेर मूळचे शिवसेना शिंदे गटाचे असलेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आपली उमेदवारी निश्चित केली. 

मतदारसंघातील प्रचाराचे मुद्दे

रांजणगाव, चाकण एमआयडीसीमधील कामगारांचा रोजगाराचा प्रश्न, चासकमान कालव्याला सुरू असलेली गळती,  कुकडी प्रकल्पाच्या पाण्याच्या वाटपाचा प्रश्न, डिंबे भोगद्याला असलेला विरोध, पुणे - नगर आणि पुणे -  नाशिक महामार्गावर ते होणारी सततची वाहतूक कोंडी, इंद्रायणी नदी प्रदूषणात झालेली वाढ, कांदा निर्यातीचा मुद्दा, मानवी वस्तीत होणारे बिबट्याच्या हल्ले हे मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात गाजले.  

Advertisement

( नक्की वाचा : लातूरकरांच्या मतदानाचा पॅटर्न काय? श्रृंगारे की काळगे कुणाला मिळणार संधी?)

अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील

अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरच्या जनतेसमोर, शेतकऱ्यांचे प्रश्न,  मतदारसंघात पूर्ण वेळ देणारा खासदार, तीन टर्म खासदार असताना केलेल्या विकासाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यात दावे-प्रतीदाव्याची लढाई पाहायला मिळाली. अभिनयातून ब्रेक घेण्याची घोषणा करत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्या पूर्ण वेळ देणारा खासदार या वक्तव्याची हवा काढली.

नक्की वाचा- Sangli Lok Sabha 2024: जिंकणार तर 'पाटील'च! पण कोणते?; सांगलीकरांचा कौल कुणाला?

अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांनी खासदार असताना पदाचा गैरवापर करत कशाप्रकारे आपल्या कंपनीला फायदा करुन देण्याच्या प्रयत्न केला. मतदारसंघातील प्रश्न संसदेत उपस्थित करण्याऐवजी कंपनीला फायदा होईल, असे प्रश्न संसदेत उपस्थित केले. कशाप्रकारे जमिनी हडपल्या, असे अनेक गंभीर आरोप अमोल कोल्हे यांनी माजी खासदारांवर केले.  

Advertisement

अजित पवारांचं चॅलेन्ज

अजित पवारांनी शिरुर लोकसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली. यासाठी अजित पवार अखेरचे काही दिवस शिरुरमध्येच तळ ठोकून होते. अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका करताना म्हटलं होतं की, हे खासदार महाशय पहिल्या 2 वर्षातच राजीनामा देणार होते. दादा मी कलाकार आहे, माझं हे काम नाही. मला राजकारण जमत नाही. अमोल कोल्हे खासदार कसे होतात बघतोच? असं आव्हानच अजित पवारांनी दिलं आहे. त्यामुळे जनता कुणाला कौल देणार हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईल.

(वाचा - Baramati Lok Sabha 2024: नणंद की भावजय? बारामतीचा गड कोणत्या पवारांकडे राहणार?)

मतदानाची टक्केवारी

शिरुर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत एकूण 59.38 टक्के मतदान झालं होतं. यावेळी मतदानाच्या टक्केवारीत घट पाहायला मिळाली. यंदाच्या निवडणुकीत एकूण 54.16 टक्के मतदान झालं आहे.  

Advertisement
  • जुन्नर - 58.16 टक्के
  • आंबेगाव - 62.95 टक्के
  • खेड आळंदी - 57.76 टक्के
  • शिरूर - 56.91 टक्के
  • हडपसर - 47.71 टक्के
  • भोसरी - 49.41 टक्के

शिरूरमधील विधानसभानिहाय ताकद

  • जुन्नर विधानसभा - अतुल बेनके (राष्ट्रवादी अजित पवार) 
  • आंबेगाव विधानसभा - दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी अजित पवार) 
  • खेड आळंदी विधानसभा - दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी अजित पवार) 
  • शिरूर विधानसभा - अशोक पवार (राष्ट्रवादी शरद पवार) 
  • हडपसर विधानसभा - चेतन तुपे (राष्ट्रवादी अजित पवार)
  • भोसरी विधानसभा - महेश लांडगे (भाजपा)