संकेत कुलकर्णी
पंढरपूर मतदार संघातील आपल्या पुतण्याची उमेदवारी कायम राखण्यासाठी आता चुलत्याने चक्क माढा मतदारसंघात राजकीय प्रेशर निर्माण केले आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी आपली माढ्यातील ताकद दाखवत पक्ष विरहीत भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत नुकत्याच झालेल्या सावंत यांच्या स्नेह मेळाव्यात त्यांची ताकद दिसली. त्यामुळे पुतण्यासाठी चुलत्याची नवी राजकीय खेळी पंढरपूर आणि माढा मतदारसंघात सध्या चर्चेला येत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख आहेत. शिवाजी सावंत यांनी यापूर्वी माढा विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढवली आहे. माढा मतदारसंघातील सुमारे 75 हजार मतांचा वर्ग सावंत यांना मानणारा असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. अशा परिस्थितीत सावंत यांचा राजकीय पाठिंबा माढ्याच्या राजकीय गणितांना कलाटणी देणारा असतो. सध्या सावंत हे शिवसेनेत नाराज असल्याचे बोलले जाते. अशा परिस्थितीत सावंत पक्ष विरहीत माढ्यात वेगळी भूमिका घेऊन महाविकास आघाडी सोबत जाण्याचे तर्क लढवले जातात. असे घडल्यास यांचे राजकीय परिणाम पंढरपूर मंगळवेढ्यातील राजकारणावर होऊ शकतात.
ट्रेंडिंग बातमी - 'ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात' भाजपचा नेता हे काय बोलला?
पंढरपुरात सध्या शिवाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी तुतारीच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या ठिकाणी काँग्रेसने देखील उमेदवार दिला आहे. यावरून आघाडीतील बिघाडी स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज माघारी घेऊन पुतण्यांची उमेदवारी राखण्यासाठी आता माढ्यातील निर्माण केलेला राजकीय प्रेशर पॉईंट सावंत यांना उपयोगी येऊ शकतो. याच सोबतीने सावंत यांची माढा मतदारसंघात असणारी राजकीय ताकद देखील अधिक बळकट होऊ शकते. पक्ष विरहीत स्वतंत्र भूमिका सावंत यांनी घेतली तर याचा फायदा निश्चितच माढ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना होऊ शकतो अशी चर्चा आहे.
ट्रेंडिंग बातमी - मनसेची बदलती भूमिका अन् 2024 ची निवडणूक! राज ठाकरेंनी काय काय केलं?
पंढरपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसने भागिरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अनिल सावंत यांना उमेदवारी दिली आहे. इथे महाविकास आघाडीने एकाच मतदार संघात दोन उमेदवार दिले आहेत. तर भाजपने विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनाच मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे इथली लढत ही सध्या तरी तिरंगी असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जवळपास पन्नास हजाराचे मताधिक्य होते.