विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता हळूहळू रंग भरू लागले आहेत. उमेदवार प्रचारालाही लागले आहेत. मात्र या प्रचारात काही अती उत्साही नेत्यांमुळे उमेदवारांची मात्र पंचाईत होत आहे. बोलण्याच्या भरात ते भलतच बोलून जात आहेत. असाच काहीसा प्रकार उल्हासनगर निधानसभा मतदार संघात घडला आहे. इथे भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी बैठक घेण्यात आली होती. यावेळी भाजप उल्हासनगर अध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी भाषण ठोकलं. यावेळी बोलताना, ज्यांना गद्दार म्हटलं जातं, ते मुख्यमंत्री होतात, असं खळबळजनक विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत मात्र तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रदीप रामचंदानी हे उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्ष आहेत. उल्हासनगरमध्ये भाजप बरोबर साई पक्ष ही आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रामचंदानी यांनी भाषण करताना एकच खळबळ उडवून दिली. उल्हासनगर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीचा दाखला देत असतानाच अचानक त्यांनी "आता कुणीही गद्दार राहिलेलं नाही, ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात. राजकारणाची परिभाषा बदलली आहे. असं वक्तव्य करत त्यांनी एकच खळबळ उडवून दिली. त्यावेळी मंचावर उपस्थित असलेले भाजपचे उमेदवार कुमार आयलानी हे गोंधळून गेले. काय करावे हेच त्यांना समजले नाही.
ट्रेंडिंग बातमी - मनसेची बदलती भूमिका अन् 2024 ची निवडणूक! राज ठाकरेंनी काय काय केलं?
भाषणात पुढे बोलताना ते म्हणाले, ज्यांना आम्ही काल गद्दार म्हणत होतो, ते आज आमच्या पक्षात सहभागी झाले आहेत. त्यांना आज आम्ही खुद्दार म्हणतो. काळाने हा बदल केला आहे. सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेत फूट पडल्यनंतर ते मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्यावर पन्नास खोके आणि गद्दारीचा आरोप झाला होता. त्यामुळे प्रदीप रामचंदानी यांनी गद्दार नक्की कोणाला संबोधले याची चर्चा मेळाव्या ठिकाणीच सुरू झाली.
ट्रेंडिंग बातमी - दादांची आबांवर टीका, शरद पवार पहिल्यांदाच बोलले, अजित पवारांना थेट सुनावले
मेळावा संपल्यानंतर मात्र प्रदीप रामचंदानी यांना सारवासारव करावी लागली. मी तसं बोललोच नाही. विरोधक ज्यांना गद्दार म्हणतात, ते मुख्यमंत्री बनतात. ते गद्दार नव्हे, तर खुद्दार असतात अशी सारवासारव करण्याची वेळ त्यांच्यावर आली. उल्हासनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचीही ताकद आहे. कुमार आयलानी यांच्यासाठी त्यांची मदत महत्वाची आहे. मात्र प्रदीप रामचंदानी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज होण्याची दाट शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world