- महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेताना खर्चाविषयी प्रश्न विचारला जात आहे
- सुभाष देशमुख यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे
- देशमुख यांच्या मते आर्थिक क्षमता निकष ठरल्यास निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याचा धोका आहे
सौरभ वाघमारे
सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महायुती, महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे. तर काही ठिकाणी स्वबळाचा नारा आहे. त्याच वेळी उमेदवारांची चाचपणी ते त्यांच्या मुलाखती ही घेतल्या जात आहेत. त्यात उमेदवारांना वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहे. त्यांनी केलेल्या कामाचा आढावा ही घेतला जात आहे. निवडून येण्याची क्षमता, पक्षासाठी केलेलं काम या सर्व गोष्टी पाहील्या जातात. पण या पेक्षा ही मोठा आणि महत्वाचा प्रश्न सध्या भाजपच्या इच्छुकांना विचारला जात आहे. त्यामुळे नवा वादंग पक्षात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याला कारण ही तसेच आहे. भाजपच्या जेष्ठ आमदार आणि माजी मंत्री असलेल्या नेत्याने या प्रश्नावर आक्षेप घेत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
हा प्रश्न म्हणजे तुम्ही किती खर्च करणार? याबाबत सुभाष देशमुख यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सोलापूर मध्ये महानगर पालिका निवडणूक लाडवण्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती भाजपकडून सुरू आहेत. इथं इच्छुकांना किती खर्च करणार हा प्रश्न सर्रास विचारला जात आहे. भाजपमध्ये पूर्वी उमेदवारी देताना “पैसे किती आहेत?” असा प्रश्न कधीच विचारला जात नव्हता, असं सुभाष देशमुख म्हणाले. महापालिका निवडणुकीत मात्र खर्चाबाबत विचारणा होत आहे. “निवडणूक लढवायला किती खर्च झेपेल?” याची चाचपणी सुरू आहे असं ही ते म्हणाले. यावर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपची परंपरा कधीही पैसा आधारित उमेदवारीची नव्हती असं ही ते म्हणाले. आर्थिक क्षमता निकष ठरू लागली तर निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची भीती आहे. संघर्षातून आलेले पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत कार्यकर्ते बाजूला पडण्याचा धोका आहे असं ही ते यावेळी म्हणाले. पैसा निर्णायक ठरल्यास भाजपच्या कार्यकर्ता या केंद्रीत प्रतिमेला धक्का बसू शकतो. “पैसे आहेत का?” अशी विचारणा झाली, हे पक्षासाठी गंभीर संकेत मानले जात आहेत असा इशाराही त्यांनी या निमित्ताने दिला आहे. देशमुख या पैशांच्या प्रश्नाबाबत थेट बोलले आहेत. त्यामुळे याबाबतची चर्चा सोलापूरच्या राजकारणात चर्चीली जात आहे.
भाजप उमेदवारीसाठी कधीही पैसे घेत नाही, असा आमदार सुभाष देशमुख यांचा दावा आहे. मात्र काही ठिकाणी नवखे लोक उमेदवारांच्या मुलाखती घेत असल्याची चर्चा आहे. हे लोक भाजपच्या मूळ संस्कृतीशी अपरिचित असल्याचा आरोप होत आहे. पैसा महत्त्वाचा ठरू लागला तर काँग्रेस सदृश कल्चर रुजण्याची शक्यता आहे. पक्ष नेतृत्वाने या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. भाजपची विचारधारा पैसा नव्हे, तर निष्ठा आणि कामगिरीवर आधारित असावी, अशी ठाम भूमिका मांडली जात असल्याचं आमदार सुभाष देशमुख म्हणाले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तूळात नक्कीच उमटले आहे. त्यावर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.