Nashik Municipal Corporation Election 2026: महाविकास आघाडीची साथ सोडून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला साद घालण्यास सुरूवात केली आहे. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पुण्यासोबतच अन्य काही महापालिकांमध्येही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे अजित पवारांनी थेट महाविकास आघाडीलाच साद घालणे सुरू केले आहे.
नक्की वाचा: शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मविआ नेत्यांशी संपर्क
माजी आमदार आणि शिवसेना (उबाठा) चे नाशिकमधील नेते वसंत गीते यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने संपर्क साधल्याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, "काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार), मनसे, शिवसेना(उबाठा) यांची चर्चा सुरू आहे, माजी खासदार देविदास पिंगळे यांचा तीन दिवसांपूर्वी निरोप आला की पुण्यात घडतंय ते नाशिकमध्ये करा असे अजित पवार यांचे म्हणणे आहे. सगळे एकत्र लढू असा त्यांचा निरोप होता. यासंदर्भात काही निर्णय झाला आहे का ? असे विचारले असता गीते यांनी सांगितले की यासंदर्भात महाविकास आघाडीतील सगळ्या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा होईल. शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि त्यानंतरच याबद्दलचा निर्णय होईल.
नक्की वाचा: पुण्यात महायुतीच्या जागावाटपाचा वाद! शिंदे गटाकडून स्वबळाची तयारी?
पुण्यात शिवसेना आणि मनसेचं ठरलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रितरित्या आपण युती करत असल्याचे जाहीर केले होते. मुंबईसाठी या दोन्ही पक्षांनी युती केली असून, पुण्यातही या दोन पक्षांनी युती केली आहे. पुण्यात दोन्ही सेनांनी जागावाटपाचा प्रश्न सोडवला आहे. पुण्यात शिवसेना (उबाठा) 91 जागा तर मनसे 74 जागा लढणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिली आहे. दोन दिवसांत याची अधिकृत घोषणा होईल आणि दोन्ही ठाकरे बंधू यासंदर्भात घोषणा करतील असे कळते आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world