मनोज सातवी, पालघर
भिवंडी लोकसभा मतदारसंघात येत्या 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्याआधीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. भिवंडी लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे शिवसेनेच्या वाटेवर आहेत.
रुपेश म्हात्रे आज संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून रुपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. रुपेश म्हात्रे यांच्या भूमिकेमुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अंतर्गत नाराजी असल्यामुळे रुपेश मात्रे यांना डावलले जात असल्याचे बोलले जात आहे. तसेच रुपेश म्हात्रे यांना त्यांचे कट्टर विरोधक समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांच्यासोबत प्रचार करण्याची वेळ आल्याने ते नाराज होते. तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून राजकीय दबाव येत असल्याने ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
(नक्की वाचा - 'विश्वजीत कदम वाघच,संधी बघून वाघ झडप घालतो')
मुंबई, ठाणे पाठोपाठ भिवंडी देखील शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र शिंदे यांच्या बंडाळीनंतर भिवंडीतील शिवसेनेमध्ये देखील मोठी फूट पडली. यामध्ये माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी एकनाथ शिंदेंसोबत न जाता ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु महाविकास आघाडीच्या प्रचारादरम्यान रुपेश मात्रे यांना डावलले जात असल्यामुळे शिवाय, ज्यांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक हरले त्या आमदार रईस शेख यांच्यासोबत प्रचार करण्याची वेळ आल्याने रुपेश म्हात्रे नाराज असल्याचे बोलले जात आहे.
(नक्की वाचा- ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शो केला त्यांचंच नाव विसरला गोविंदा)
मागील काही दिवसांपासून म्हात्रे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रुपेश म्हात्रे शिवसेनेत प्रवेश करू शकतात. रुपेश म्हात्रे यांनी जर शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, तर त्यांचा प्रवेश विद्यमान खासदार आणि महायुतीचे
उमेदवार कपिल पाटील यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.
यासंदर्भात रुपेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटलं की, सध्या मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहे. तसंच ज्या राजकीय चर्चा सुरू आहेत त्याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.