मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याची पहिली मोठी परीक्षा आगामी लोकसभा निवडणुकीत होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळं होतं शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेना पक्षाचा ताबाही त्यांना मिळाला. कायदेशीर लढाई जिंकलेले एकनाथ शिंदे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले. शिवसेना राज्यात डझनहून अधिक जागांवर लढत आहे. मात्र दोन जागा शिवसेनेसाठी आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी सर्वाधिक प्रतिष्ठेच्या आहेत. यामध्ये एकनाथ शिंदेचे सुपूत्र श्रीकांत शिंदे उमेदवार असलेली कल्याणची जागा आणि शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याची जागा यांचा समावेश आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ठाण्याच्या उमेदवारीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच देखील पाहिला मिळाली. अखेर ही जागा मिळवण्यात शिवसेनेला यश आले आणि अखेरच्या क्षणी उमेदवारीसाठी शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर करण्यात आले. तर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचं नाव पहिल्याच यादीत जाहीर करण्यात आलं होते. म्हणजेच नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच राजन विचारे यांनी महिनाभरापासून प्रचाराला सुरुवात केली आहे.
मतदारसंघाचा इतिहास
भारतीय सीमांकन आयोगाने 2008 मध्ये पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन करून ठाणे आणि कल्याण असे दोन मतदारसंघ तयार केले. मात्र इतिहास पहिला तर 1998 च्या आधी हा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे होता. मात्र त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रयत्नाने तो शिवसेनेने मिळवला. 1998 मध्ये सुरुवातीला येथे शिवसेनेचे प्रकाश परांजपे निवडून आले. त्यानंतर 1999 आणि 2004 मध्ये देखील प्रकाश परांजपे हे खासदार झाले. मात्र 2009 ला राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांनी शिवसेनेला धक्का देत शिवसेनेच्या विजय चौगुले यांचा पराभव केला. त्यानंतर शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली. परंतु 2014 मध्ये शिवसेनेचे राजन विचारे पुन्हा एकदा संजीव नाईक यांचा पराभव करत खासदार झाले. 2019 ला देखील राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.
( वाचा - 'आपण औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झालेला आहात? उद्धव ठाकरेंचं उत्तर काय?)
ठाणे मतदारसंघातील प्रश्न?
ठाणे शहराचं मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेले पाहायला मिळते. मुंबईजवळ असलेल्या या शहरात नोकरदारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र रेल्वे , पाणी, रस्ते , वाहतूक कोंडी, मेट्रो अशा मागण्या गेल्या अनेक वर्षापासून नागरिक करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री झाल्यापासूनच विकासकामांना काहीसा वेग आला आहे आणि ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण व्हावं ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. नागरिकरण वाढल्यामुळे दुसऱ्या रेल्वे स्टेशनची मागणी देखील केली जात आहे. या मागणीला मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामुळे दुसऱ्या रेल्वे स्थानकाचे काम सुरू झालं असलं तरी ते कधी पूर्ण होणार याची वाट ठाणेकर पाहत आहेत.
नरेश म्हस्केंना अंतर्गत विरोध
सुरुवातीला ही जागा नेमकी कोणाकडे जाईल यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर ही जागा शिवसेनेकडे आली. या जागेसाठी आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव चर्चेत होते. मात्र अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि ठाण्याचे माजी महापौर असलेल्या नरेश मस्के यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर भाजपकडून इच्छुक असलेले गणेश नाईक यांचे सुपुत्र संजीव नाईक हे नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. नरेश म्हस्के उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गणेश नाईक यांना भेटण्यासाठी घरी गेले असता भाजपच्या कार्यकर्तांच्या, पदाधिकाऱ्यांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला. इतकेच नव्हे तर ठाण्याचे आमदार संजय केळकर देखील भाजपला उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर प्रताप सरनाईक यांचं नाव चर्चेत असल्याने अचानक मस्के यांना उमेदवारी दिल्याने त्यांची देखील नाराजी असू शकते, अशी देखील चर्चा रंगली होती.
(वाचा - 'मी पवार साहेबांचा मुलगा असतो तर...' अजित पवार जाहीर पणे बोलले)
निष्ठावंत विरुद्ध गद्दार
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही राजन विचार यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यामुळे ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणून गणले जातात. 2019 चा अभ्यास केला तर शिवसेना अखंड होती नरेश म्हस्के यांनीच राजन विचारे यांना मदत केली होती. मात्र आता ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होईल. राजन विचारे यांनी विशेष कामे केली नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
याशिवाय विकासकामांव्यतिरिक्त ठाण्याची लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार, असली शिवसेना आणि नकली शिवसेना, आनंदी दिघे यांचे खरे शिष्य आणि खोटे शिष्य अशा शाब्दिक हल्लाबोलाने रंगलेली पाहायला मिळत आहे. मात्र एकनाथ शिंदे हे नरेश मस्के यांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून उमेदवारी खेचून आणली असली तरी भाजपच्या मदतीशिवाय हा गड सर करणे एकनाथ शिंदें शक्य होईल असं वाटत नाही.
कोणत्या पक्षाचे किती आमदार?
कल्याण लोकसभा मतदारसंघात मीरा भाईंदर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, ठाणे, ऐरोली , बेलापूर अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये मीरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रात गीता जैन (अपक्ष- भाजप पाठिंबा), कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना), ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्रात प्रताप सरनाईक (शिवसेना), ठाणे विधानसभा क्षेत्रात संजय केळकर (भाजप), ऐरोली विधानसभा क्षेत्रात गणेश नाईक (भाजप), आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रात मंदा म्हात्रे (भाजप) हे आमदार आहेत. एकूणच सहा पैकी पाच जागा महायुतीकडे असून एक जागा अपक्ष असली तरी भापलाचा पाठिंबा असल्याने ही जागा युतीचीच गणली जाते. त्यामुळे येत्या 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदार कुणाला कौल देणार हे 4 जून रोजी निकालाच्या दिवशी समोर येईल.