- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे सेनेवर उमेदवार खरेदीचे गंभीर आरोप केले
- उमेदवारांना पंधरा कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
- कल्याण डोंबिवलीत मतदारांना पाच हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप राज यांनी केला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात उमेदवार खरेदी वरून भाजप आणि शिंदे सेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय ज्या उमेदवारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला त्यांनाच स्टेजवर आणत सर्वांनाच धक्का दिला. ऐवढच नाही तर यांना किती रूपयात खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला याचा आकडाच जाहीर पणे सांगितला. हा आकडा ऐकून सर्वच जण आवाक झाले. जर तुम्ही विकास केला मग पैसे कशाला वाटता असा खडा सवाल राज ठाकरे यांनी ठाण्याच्या ठाकरे बंधूंच्या सभेतून केला. आतापर्यंत आपण अनेक निवडणुका पाहील्या. पण अशा पद्धतीने पैशांचा वारेमाप वापर झालेली ही पहिलीच निवडणूक असेल असा आरोप ही त्यांनी यावेळी केला. सत्तेसाठी कोणत्या ही थराला जाण्याची तयारी सत्ताधाऱ्यांची असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितले.
राज यांनी भाषणाच्या सुरूवाती पासून शिंदे सेना आणि भाजपवर हल्लाबोल केला. निवडणूक शेवटच्या टप्प्यावर येवून ठेपली आहे असं ते म्हणाले. आजची सभा ठाण्याची आहे. उद्या प्रचार थांबेल. मग सरकाकडून घराघरात पैसे वाटायला सुरूवात होईल. त्याची सुरूवात आधीपासून झाली आहे. सध्या भाजपचे लोक पैसे वाटत आहेत.तर शिंदेचे लोक त्यांना पकडत आहेत. कल्याण डोंबिवलीत गेलो होतो. अनेक ठिकाणी फिरलो. तिकडे प्रचंड हवा आहे. कल्याण डोंबिवलीत पाच पाच हजार रुपये मतासाठी वाटले जात आहेत. एका बाजूला विकास केला असं सांगत आहेत. तर दुसरीकडे पैसे वाटत आहेत. विकास केला मग पैसे वाटताय असा सवाल राज यांनी यावेळी केला. पण पैसे घेणाऱ्यांची आपल्याला काळजी आहे असं ते म्हणाले.
पैशाच्या जीवावर उमेदवारच खरेदी केले जात आहे. कल्याणमध्ये शैलेश धात्रक, मनिषा धात्रक, पुजा धात्रक हे तिघे जण एकाच घरातले आहेत. शिवाय ते एकाच वार्डमधून उभे आहेत. यांना किती पैशाची ऑफर झाली असेल. तुम्ही कल्पना करू शकत नाही. या तीन उमेदवारांना 15 कोटींची ऑफर दिली गेली असा गौप्यस्फोट यावेळी राज ठाकरे यांनी केला. मला त्यांना इथं बोलवायचं होतं. पण प्रचारामुळे बोलवलं नाही. त्यांना 15 कोटीची ऑफर असताना त्यांनी ती नाकारली आणि ते निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे पंधरा कोटी नाकारणे कुठे आणि पाच हजारासाठी मत विकणारे कुठे? असं राज म्हणाले. त्यानंतर त्यांनी आणखी काही उदाहरण दिली. सौ. राजश्री नाईक यांना पाच कोटी ऑफर देण्यात आली. त्यांना राज यांनी स्टेजवर बोलावले. ते म्हणाले हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त आहे. त्यानंतर सुशिल आवटे यांना एक कोटीची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी ही ती नाकारली असं ते म्हणाले. असे बरेच जण आहेत.
हा पैसा कुठून येत आहे. किती पैसे वाटायचे. हे महाराष्ट्र भर पैसे वाटले जात आहेत. पण हे पैसे आले कुठून असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. कुणाला पाच कोटी, दहा कोटी, एक कोटी दोन कोटी या महाराष्ट्रात चाललंय काय? आपण इतक्या निवडणुका पाहील्या पण अशी निवडणूक कधी पाहिली नाही. या लोकाना लगामच नाही. सर्व काही बिंधास्त पण सुरू आहे. कोर्टात आणि पोलीसात जावून काही उपयोग नाही. बदलापूरमध्ये लहान मुलीवर बलात्कार केला गेला. मुख्य आरोपी होता. त्याला काही कारण नसताना चकमकीत ठार मारले. त्याच प्रकरणातल्या सहआरोपीला भाजपने स्विकृत नगरसेवक बनवले गेले असे राज ठाकरे म्हणाले. ही हिंमत येते कुठून. कारण तुम्हाला गृहीत धरले गेले आहे. तुम्हाला पाच हजार दिले की तुम्हाला विकत घेतले जाते हे तंत्र त्यांना माहित झाले आहे असं राज यावेळी म्हणाले.
यावेळी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर ही टिका केली. शिंदेंना ठाण्यातील जंगल विकायचं आहे. मात्र त्याला गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. सध्या पाच पाच हजारात मतं विकली जात आहेत. त्यामुळे पुढची पिढी म्हणेल माझा बाप विकला गेला. आई विकली गेली. माझ्या वडीलांनी आईनं पैशासाठी मतं विकली. मित्र परिवार काय म्हणतील. कल्याण डोबिवलीत बाजार गुलामाचा बाजार मांडला गेला होता. आतापर्यंत राज्यात 62 लोकांना फॉर्म मागे घ्यायला लावले. पैसे देवून लोकांना मागे घ्यायला लावले आहे असा आरोप राज यांनी केला. सत्तेसाठी हे वेडेपिसे झाले आहेत. कुणी छाननी वेळी एबीफॉर्म खाल्ला. इतक्या टोका पर्यंत हे लोक गेले आहेत. सोलापूरच्या आमच्या कार्यकर्त्याचा खून केला. इथं पर्यंत सरकार गेल आहे. पोलीस हताश आहेत. कोर्टाकडे बघायलाच नको. हे कोणतं राजं आहे. असा प्रश्न राज यांनी यावेळी केला.