- महायुतीने महापालिका निवडणुकीसाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला तरी स्थानिक पातळीवर युतीत तणाव दिसून येतो
- ठाणे, मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीतील स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद वाढत आहेत
- भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाणे शहरात शिंदे गटाशी युतीविरोधात आवाज उठवला आहे.
रिझवान शेख
महापालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे. महायुतीने आपण जास्तीत जास्त ठिकाणी एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. असं असलं तरी हे फक्त वरच्या पातळीवर ठरलं आहे. स्थानिक पातळीवर चित्र अगदी विरुद्ध आहे. मग ते मुंबई असो ठाणे असो की कल्याण डोंबिवली. अगदी पुणे पिंपरी चिंचवडमध्ये ही अशीच स्थिती आहे. महायुतीमधील स्थानिक नेत्यांमध्ये विस्तवही जात नसल्याचं चित्र आहे. हा वणवा आता थेट शिंदेंच्या ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. ठाण्यात शिंदेंची शिवसेना मोठ्या भावाच्या भूमीकेत आहे. अशा वेळी भाजप इथं आक्रमक झाली आहे. त्यांनी नवाच फॉर्म्यूला समोर आणला आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना युती हवी आहे. असं असलं तरी भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिऱ्यांचा मात्र युती विरोधात सूर कायम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात कोपरी मधील भाजपच्या मंडळ अध्यक्षांनी युती विरोधात पहिली ठिणगी टाकली. त्यानंतर कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही युती झाल्यास 50 टक्के जागांची मागणी केली आहे. नाही तर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एक वेगळाच ट्वीस्ट ठाण्यात निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मधील प्रकार काही वेगळेच आहेत. इथल्या भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना गेल्या 8 वर्षांत शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्रास दिलेला आहे. त्यात अनेक वेळा मारहाण, खोटे गुन्हे, समाजाकी कार्यात केलेला हस्तक्षेप, दादागिरी, युतीधर्म न पाळणे या सारख्या तक्रारी भाजप कार्यकर्त्यांच्या आहेत. पक्षाने आयोजित केलेल्या बैठकीत याचे पाढेच पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या समोर वाचून दाखवले. शिवाय युती बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
ठाण्यात जर शिवसेना शिंदे गटासोबत युती केल्यास प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असा सुरही काहींनी लावला. जर युती करायची असेल सम-समान न्याय मिळायला हवा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आमदारांनी देखील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले आहे. तुमच्या भावना वरिष्ठांकडे मांडल्या जातील असं त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यामुळे जागा वाटप जरी ठरले नसले तरी त्याआधीच ठाण्यात भाजप-शिवसेना यांच्यात धुसफूस होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे युतीचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.