रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ महायुतीत कोणाकडे जाणार यावर शेवटपर्यंत चर्चा झाली. शिंदे गट आणि भाजप या जागेसाठी कमालीचे आग्रही होते. शेवटी हा मतदार संघ राणेंच्या पारड्या पडला. राणे निवडूनही आले. पण त्यानंतर खरा शिमगा सुरू झाला. मतमोजणी झाल्यानंतर नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त करत युतीचा धर्म पाळला गेला नाही. त्यांचा हिशोब केला जाईल असा थेट आरोप करत इशाराच दिला. राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मताधिक्य मिळाले. पण मंत्री असलेल्या उदय सामंत यांच्या रत्नागिरीतून राणे पिछाडीवर होते. त्यामुळे राणेंनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर लगेचच निलेश राणे आणि नितेश राणे यांनी राजापूर - रत्नागिरी या शिवसेनेच्या दोन्ही विधानसभा मतदार संघावर दावा केला. त्यामुळे वाद आणखीनच वाढला. उदय सामंत यांनी संयमाची भूमीका घेत कोणाच्या सर्टीफीकेटची आपल्याला गरज नाही असे ते म्हणाले. पण या वादात शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी उडी घेतली आणि वातावरण आणखीनच तापले. गोगावलेंनी घेतलेल्या भूमीकेने तर राणेंची भाषाच बदलून गेली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले भरत गोगावले?
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून राणेंना तिकीट मिळवून देण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा हात होता. त्यांच्यामुळेच राणेंना उमेदवारी मिळाली असे भरत गोगावले म्हणाले. किरण सामंत यांना तिकीट वगळून राणेंना तिकीट दिले. राणेंना मिळालेली मतेही शिवसेनेचीच आहेत. हे निलेश आणि नितेश राणे यांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे यापुढे बोलताना दोन्ही भावांनी सांभाळून बोलावे. नाहीतर येणाऱ्या पदविधरच्या निवडणुकीत आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच राणेंना गोगावले यांनी दिला. ते येवढ्यावरच थांबले नाही. आमच्याही काही जागा पडल्या आहेत. तिथे आम्ही काही दावा करत बसलो नाही. त्यामुळे पुर्वीच्या मतदार संघावर कोणालाही दावा करता येणार नाही. अन्यथा आम्ही देखील पुढचा विचार करू अशा शब्दात गोगावलेंनी राणेंना ठणकावले आहे.
हेही वाचा - मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातले 4 चेहरे? 'या' 4 नावांची चर्चा, आठवलेंचं काय?
निलेश राणेंची भाषा बदलली
भरत गोगावलेंनी ठणकावल्यानंतर निलेश राणे यांची भाष बदलली. त्यांनी एक व्हीडिओ ट्वीट केला आहे. त्या ट्विटमध्ये ते सांगत आहेत की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भक्त आहे. त्यांना त्रास होईल असं मी आणि नितेश करणार नाही. त्यांनी आमच्यासाठी जे केले आहे ते आम्ही विसरणार नाही. माझा एका वक्तव्याचे भरत गोगावले यांना वाईट वाटले. त्यावर त्यांना एकच सांगेन ते सिनिअर आमदार आहेत. खरं तर त्यांनी मंत्री व्हायला हवं होतं. पण ते झाले नाहीत. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. पण ते भेटले तर त्यांना प्रकरण काय आहे हे सविस्तर सांगेन. असे निलेश राणे यांनी ट्वीट केले आहे.
हेही वाचा - मोठा गौप्यस्फोट! प्रतिभा धानोरकरांचा 'लाख' मोलाचा विजय, पडद्यामागून कोणाची मदत?
काय केला होता निलेश राणेंना आरोप
रत्नागिरीतल्या तीनही विधानसभा मतदार संघातून नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले नव्हते. त्यात राजापूर, रत्नागिरी आणि चिपळून विधानसभेचा समावेश आहे. सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे या मतदार संघांची जबाबदार त्यांची होती. ज्या पद्धतीने त्यांनी काम करायला पाहीजे होते तसे झाले नाही. ते लिड का देवू शकले नाही हे उदय सामंत सांगतील असेही ते म्हणाले होते. शिवाय राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा हे मुळचे भाजपचे मतदार संघ आहेत. त्यामुळे हे भाजपला मिळावेत यासाठी आपण आग्रह धरणार असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राणे यांच्या वाद पेटला.