- मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
- मराठी हे हिंदू नाहीत का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
- उद्धव ठाकरे यांनी मुंबईची संस्कृती आणि मराठी अस्मितेवर होणाऱ्या आक्रमणाचा उल्लेख करत विरोधकांना इशारा दिला
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज शुक्रवारी प्रदर्शित झाला. दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे हिंदू, हिंदूत्व, मराठी माणूस याबाबत काही प्रश्न विरोधकांना विचारले आहेत. त्यांनी एक प्रकारे गुगली टाकत विरोधकाना क्लिन बोल्ड करण्याचा प्रयत्न यातून केलेला दिसतोय. यावेळी त्यांनी मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असे ठणकावून सांगितले. शिवाय भाजपला जुन्या काही गोष्टींची आठवण करून देत त्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत भाजप आणि विरोधकांना केलेल्या प्रश्नांची उत्तर काय येतात हे ही तितकेट रोचक ठरणार आहे.
या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही सातत्याने सांगतोय की मुंबईचा महापौर मराठी होईल. पण भाजप म्हणतेय मुंबईचा महापौर हिंदू होईल. याचा अर्थ असा आहे का की भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही ? फडणवीस हिंदू आहेत की नाहीत? संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मराठी माणसावर गोळ्या झाडा हे सांगणारे मोरारजी देसाई हे हिंदू होते की नव्हते? असे एका पाठोपाठ तीन प्रश्न विचारत उद्धव यांनी भाजपची मराठी आणि हिंदू या मुद्द्यावर कोंडी केली. या प्रश्नांची उत्तर आता भाजपला द्यावी लागणार आहेत.
नक्की वाचा - PMC Election 2026: 'पुणे लवकर बरबाद होईल'!, राज ठाकरे आपल्या मुलाखतीत असं का म्हणाले?
त्याच वेळी उद्धव यांनी आणखी एक जुनी गोष्टा भाजपला सुनावली. ते म्हणाले मोदींना जेव्हा वाजपेयी केराच्या टोपलीत टाकणार होते, तेव्हा त्यांना वाचवणारे बाळासाहेब ठाकरे हे मराठी होते. हिंदू आणि मराठीत गफलत करण्याचा त्यांनी चालवलेला प्रकार बंद करावा असा इशार त्यांनी या निमित्ताने विरोधकांना दिला आहे. ते पुढे म्हणाले मुंबईची संस्कृती मारली जात आहे. कोणी सांगतो की या भागाची भाषा गुजराती आहे. हिंदी सक्ती केली जात आहे. आमची अस्मिता संस्कृती मारणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रात ठेवणार याला अर्थ नाही असं ही ते म्हणाले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी धनदांडगेच मागणी करत होते की मुंबई गुजरातला द्या. आजही तीच परिस्थिती आहे असं उद्धव म्हणाले. त्यावेळी जर 5 लोकं असतील तर आज 500 लोकं झाली आहेत. केंद्र आणि राज्यामार्फत ज्या गोष्टी करवून घेतल्या जात आहे, तो धोका अधिक वाटतोय. वाढवण बंदराला लागून विमानतळ कशाला हवंय? हळूहळू करत मुंबईतील डोमेस्टीक आणि इंटरनॅशनल फ्लाईट ही नवी मुंबईला नेणार. मुंबईतला भाग विकायला काढणार असा त्यांचा प्लॅन असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत केला. भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष मुंबईला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजतात. आज ते कोंबडी कापायला निघालेत असा आरोप त्यांनी केला. आम्ही केलेल्या कामांचे श्रेय आम्ही घेतो. आमच्या योजनांच्या आडवे येऊन दाखवा असा दम ही ठाकरे यांनी यावेळी भरला.
नक्की वाचा - Akola News: ‘एक घर – दोन उमेदवार' यंदाच्या निवडणुकीतला नवा ट्रेंड जोरात, काय आहे गणित?
त्रास होत असतानाही लोकं आमच्याविरोधात भाजपला मतदान करणार असतील तर भाजपवाले त्यांना वाचवण्यासाठी येणार नाहीत असं ही ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांची सध्या नुरा कुस्ती आहे, विरोधकांना स्पेसच ठेवायची नाही. एकमेकांवर आरोप करायचे. निवडून आल्यानंतर एकत्र यायचे. त्यात मिंधेंना मराठी मते फोडण्यासाठी वापरलं जात आहे. मराठी माणसात फूट पाडणे हे मिंधेंना दिलेले काम आहे असा आरोप ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र लाचार होत नाही हे दाखवणं गरजेचं आहे. आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी एकत्र आलो आहोत. याचा अर्थ अन्य भाषिकांवर अन्याय करण्यासाठी आलो असा होत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.