- राज ठाकरे यांनी पुणे शहर लवकरच बरबाद होईल अशी गंभीर भविष्यवाणी केली आहे.
- उद्धव ठाकरे म्हणाले की मुंबईतील विकास नियोजनाशिवाय होत आहे.
- मुंबईतील कांदळवनं विकासासाठी तोडल्याबाबत उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यात महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रचाराचा धुरळा उडवत आहेत. त्याच वेळी ठाकरे बंधुंची संयुक्त मुलाखत प्रकाशीत झाली आहे. खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत दोन्ही ठाकरे बंधुंनी आपली रोखठोक भूमीका मांडली आहे. यात सर्वांचे लक्ष वेधले ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याबाबत केलेल्या वक्तव्याने. कारण त्यांचे हे वक्तव्य तितकेच गंभीर आणि सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारेच म्हणावे लागेल. त्याची चर्चा या मुलाखतीनंतर राजकीय वर्तूळात रंगली आहे.
पुण्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. ते म्हणाले की पुणे लवकर बरबाद होईल. हे धक्कादायक विधान त्यांनी का केलं हे जाणून घेतलं पाहीजे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंची संयुक्त मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी राज यांनी हे विधान केले आहे. महेश मांजरेकरांनी काही प्रश्न केले. त्यात ते म्हणतात मी बाहेर पडतो तेव्हा मला लाज वाटते की माझी मुलं या शहरात वाढणार आहेत. इथं हवेची गुणवत्ता वाईट आहे. मुंबई गर्दीमुक्त कधी होणार? शिवाय मुंबईत आता विकासासाठी जागाच राहिली नाही असा प्रश्न ते करतात.
त्याला आधी उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणतात इतकं प्रदूषण कधी झालं होतं का? भाजपने होर्डींग लावली आहेत. त्यात म्हटलंय विकासाची गती. ही विनाशाची गती आहे. नियोजनशून्य विकास हे याचे कारण आहे. आज सगळीकडे रस्ते खोदले आहेत. मोठ-मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. मेट्रो आहे. पूल आहे. हे सगळं एकाचवेळी सुरू आहे. एकाचवेळी हे सुरू असताना खर्चाचा ताळमेळ बसवणं गरजेचं आहे. तुमच्या घरापासून हॉस्पीटलपर्यंत सरळ रस्ता जातो, याला मी विकास म्हणत नाही. हॉस्पीटल कमीत कमी असणे आणि आयुष्य चांगले असणे हा विकास आहे असं उद्धव म्हणाले.
या प्रश्नाला राज ठाकरे यांनी ही आपल्या खास ठाकरे शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले मुंबई असो की पुणे या शहरांत रिडेव्हलपमेंटची प्रचंड मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. ही कामे करताना डीपी बनतो पण टाऊन प्लॅनिंग होत नाही. यामुळेच मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला. पण पुणे लवकरात लवकर बरबाद होईल अशी भिती आणि भाकीत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यांच्या या भाकिताला अनेक कंगोरे आहेत. शिवाय ते सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारे आहेत अशी प्रतिक्रीया या मुलाखतीनंतर उमटत आहेत. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचे पडसाद पुणे महापालिका निवडणुकीत उमटल्या शिवाय नक्कीच राहाणार नाहीत. पुण्यात राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या ठिकाणी त्यांची शिवसेनेसोबत युती झाली आहे.
तर उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की आमची होर्डींग लागली आहेत. तशी 2012 पासून आम्ही लावतोय. होय हे आम्ही केलं, याबद्दल मला आणि मुंबईकरांना अभिमान आहे. कोस्टल रोड हा आपण केला आहे असं उद्धव यांनी आवर्जून सांगितला. विकासाच्या नावाखाली कांदळवने तोडली जात आहेत. मुंबईतील कांदळवनांची भरपाई ही चंद्रपूरला करणार आहेत. विकासाला याचा कसा फायदा होईल? 2017 साली मुंबईला पाणी पुरवठ्यासाठी गारगाई पिंजाळ पाणी प्रकल्पाचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्याचे प्रेझेंटेशन घेतले. तेव्हा मला एक धक्कादायक बाब लक्षात आली की हा प्रकल्प करण्यासाठी 6 लाख झाडं कापावी लागतील. जंगल नामशेष करावे लागेल. जंगल नष्ट होणार म्हणजे पर्यावरण संकटात येणार. या सर्व गोष्टीचा विचार केला गेला.
ऐवढा खर्च केल्यानंतर पुन्हा पावसावर अलंबून राहणार. याला पर्याय म्हणून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्याच्या पायलट प्रोजेक्टला मंजुरी दिली. हा प्रकल्प अस्तित्वात आला असता तर तानसातून जितकं पाणी मिळतं तितकं पाणी मिळालं असतं. त्यानंतर आलेल्या सरकारने मात्र कंत्राटदारांसाठी हा प्रकल्प बाजूला ठेवून सरकारने गारगाई-पिंजाळ प्रकल्पाला हात घातला असा आरोप त्यांनी यावेळी केला. कारशेडसाठी आरेचे जंगल कापण्याची गरज नव्हती हे मी म्हटलं होतं. त्याऐवजी कांजुरमार्गला कारशेड करा असं म्हणत होतो. आता आरेमध्ये कारशेड केल्यानंतर ते कांजुरमार्गलाही करत आहेत असं ही उद्धव म्हणाले. तर गोदरेजची खासगी जागा आहे, तिथे एकही झोपडपट्टी मिळणार नाही, मात्र सरकारच्या जागांना कोणी मायबापच नाही. सरकारी वचक येणं गरजेचं आहे. आम्ही उद्या राज्यात आलो तर आम्ही तो आणू. जागा संपली आहे. दिल्लीतील हालत काय आहे? दिल्लीत केंद्र आणि राज्य दोन्ही गोष्टी तिथे आहेत. पण परिस्थिती बिकट आहे असं राज यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world