- अकोला महापालिका निवडणुकीत तब्बल सहा दाम्पत्यं थेट निवडणूक लढवत आहेत.
- या निवडणुकीसाठी अकोल्यात एकाच कुटुंबातून दोन किंवा तीन उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पती-पत्नी वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत
योगेश शिरसाट
यंदा निवडणुकीत ‘एक घर – दोन उमेदवार' हा नवा ट्रेंड जोरात आला आहे. आरक्षणामुळे पती-पत्नी, आई-मुलगा, भाऊ-बहिण अशा नात्यांच्या जोड्या राजकारणाच्या मैदानात उतरल्या आहेत. अकोला तर यामध्ये अग्रेसरच ठरल आहे. कारण अकोल्यात तब्बल 6 पती-पत्नींची दाम्पत्यं थेट निवडणूक रिंगणात उतरली आहेत. त्यामुळे ‘घरगुती राजकारणाचा' ट्रेंड सध्या अकोल्यात पाहायला मिळत आहे. एकाच घरात दोन दोन तर कुठे तिन तिन उमेदवाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. असं असलं तरी नेत्याच्या सांगण्यावरून त्यांनाही या जोडगोळीचं काम करणं भाग पडत आहे.
अकोल्यात महापालिकेच्या 80 जागांसाठी तब्बल 469 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 6 पती-पत्नी नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहत आहेत. अकोला महापालिकेला नात्यागोत्यांचं राजकारण काही नवीन नाही. 2017 मध्येही दोन दाम्पत्यांनी एकत्रितपणे विजय मिळवला होता. भाजपचे विजय अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी सुनिता अग्रवाल यांना यंदाही भाजपने उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय बडोणे सहाव्यांदा तर त्यांची पत्नी माधुरी बडोणे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.पतीची आणि प्रभागातील नागरिकांची साथ मिळत असून पुन्हा महानगरपालिकेत जोडीने जाऊ असं या दाम्पत्याचं म्हणणं आहे.
हीच ‘घरातली लढत' इतर पक्षांतही पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शहरप्रमुख अश्विन नवले आणि त्यांची पत्नी, माजी नगरसेविका सपना नवले दोघेही एकाच प्रभागातून सोबत रिंगणात आहेत. उबाठा गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे आणि त्यांची पत्नी सुरेखा काळे सुद्धा वेगवेगळ्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत.काँग्रेसचे अफसर कुरेशी आणि त्यांची पत्नी निखत शाहीन कुरेशी हे ही मैदानात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून नकिर खान आणि त्यांची पत्नी समीना खान, ही दाम्पत्यंही निवडणुकीच्या मैदानात उतरली आहेत.
नक्की वाचा - PMC Election 2026: 'पुणे लवकर बरबाद होईल'!, राज ठाकरे आपल्या मुलाखतीत असं का म्हणाले?
मतदार म्हणजेच कुटुंब, आणि पत्नी म्हणजे प्रचाराची ताकद असं म्हणत अश्विन नवले यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे. त्या शिवसेनेकडून मैदानात आहेत. पती-पत्नी दोघेही नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहात आहेत. त्यासाठी त्यांनी ताकद ही लावली आहे. प्रचाराचा धुरळा सध्या अकोल्यात उडताना दिसत आहे. सर्वच पक्षात एकाच कुटुंबात दोन दोन तिन तिन उमेदवारी दिलेल्या आहेत. त्यामुळे जोडीने महापालिका गाठायची यासाठी आता तयारी सुरू झाली आहे. पण अकोलेकर त्यांची ही इच्छा कितपत पूर्ण करतात, हे मात्र 16 तारखेला मतमोजणीतच स्पष्ट होणार आहे. पण एक घर दोन उमेदवार हा ट्रेंड सध्या जोरात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world