'एकीकडे लढण्याचे नाटक, दुसरीकडे बिनशर्त पाठिंबा' राज यांना उद्धव यांनी डिवचले

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंब्यावरून डिवचले आहे. मोदींना राज यांनी बिनशर्त पाठिंबा देऊ केला आहे, याबाबत उद्धव यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी एकीकडे लढण्याची भाषा करतात आणि दुसरीकडे बिनशर्त पाठिंबा देतात, ही नाटकं जनता बरोबर ओळखते अशा शब्दात उद्धव यांनी राज यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज यांनी मोदींना पाठींबा का हे सांगताना मुख्यमंत्रीपद किंवा 40 आमदार फुटले म्हणून भूमिका बदली नाही असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला होता. त्यालाच उद्धव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

लोकशाही विरुद्ध हुकूमशाही 
देशाची सत्ता सध्या एकाच व्यक्तीच्या हातात आहे. हे देशासाठी घातक आहे. हीबाब बदलली पाहीजे. देशात समिश्र सरकार आले पाहीजे अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडत, राज यांच्या भूमिकेला छेद दिला. हुकूमशाहीला स्विकारणे देशासाठी घातक आहे. एका व्यक्तीच्या हातात देश गेला तर तो देशाचा गळा घोटेल असेही त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षापासून हेच सुरू असल्याचं ते म्हणाले. 

'जो देईल साथ त्याचा करू घात'   
देशाला मोदी सरकार नाही भारत सरकारची गरज आहे. भाजप देशातील इतर पक्ष संपवण्याच्या मार्गावर आहे. त्यांना देशात एकच पक्ष पाहीजे आहे. 'जो देईल साथ त्याचा करू घात' अशी भूमिका भाजपची असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. जर शिवसेना नकली असेल तर भाजपमध्ये किती जण असली आहेत. बाहेरचे तुम्हाला का घ्यावे लागत आहेत असा प्रश्नही उद्धव यांनी यानिमित्ताने केला. त्यामुळे स्वत:चा चेहरा आधी आरशात बघा. येवढा मेकअप का करावा लागतोय याचाही विचार करा असा सल्ला त्यांनी यावेळी भाजपला दिला. 

देशाला समिश्र सरकारची गरज 
देशाचे सरकार एकाच व्यक्तीच्या हाती नको. त्याने देशाचे नुकसान होते असे उद्धव म्हणाले. देशात जेव्हा समिश्र सरकार होती त्यावेळी देशाचा चांगला विकास झाला होता असेही ते म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी, नरसिंहराव, मनमोहन सिंग यांच्या काळातल्या सरकारांचा त्यांनी यावेळी आवर्जुन उल्लेख केला. येत्या काळातही इंडीया आघाडीचं समिश्र मजबूत सरकार देशात येईल असे ते म्हणाले.  सर्वांना बरोबर घेवून जाणारा कणखर नेता त्याचे नेतृत्व करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Advertisement