लोकसभेला भिवंडी मधील मतदारांनी दाखवलेली एकजूट पुन्हा एकदा दाखवण्याची वेळ आली आहे. त्यावेळी विरोधकांनी हिंदू मुस्लिम मत विभाजन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही एक फायदा झाला नाही. महाविकास आघाडीचाच भिवंडीत विजय झाला. आता विधानसभा निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी म्हणून पाहायचे आहे ना? तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार बाळ्या मामा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भूवया मात्र उंचावल्या आहेत. समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस शेख यांच्या प्रचारासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उध्दव ठाकरे यांना पुन्हा सन्मानाने बसलेले पहायचे आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विजय महत्वाचा आहे. असे बाळ्या मामा म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण याचा निर्णय अजूनही झालेला नाही. निवडणूक निकालानंतर कोण मुख्यमंत्री होणार याचा निर्णय होणार आहे. या बाबत मविआतील तिन्ही पक्षाने सांगितले आहे. पण काँग्रेस असेल,राष्ट्रवादी शरद पवार किंवा शिवसेना ठाकरे गट असेल मुख्यमंत्री आपलाच होणार असं सांगत असतात. पण राष्ट्रवादीच्याच खासदाराने उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - प्रियांका गांधींनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधलं साम्य, पाहा VIDEO
भिवंडीमधून रईस शेख हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना समाजवादी पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. पाच वर्षात भिवंडी शहरात जाती धर्माचे राजकारण न करता त्यांनी विकासाचे राजकारण केले असं बाळ्या मामा यावेळी म्हणाले. भिवंडी शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर महाविकास आघाडी भिवंडी पूर्व मध्येच नव्हे तर राज्यात सत्तेवर येणे गरजेचे आहे असे ही ते म्हणाले. भिवंडीतील जनता नशीबवान आहे. रईस शेख यांनी ज्या कामांची सुरुवात केलेली आहे ही तर फक्त सुरुवात आहे.
ट्रेंडिंग बातमी - भन्नाट हिंदी , सॉलिड कविता! प्रियांका गांधींची सभा घोगरे काकींनी गाजवली
येणारे सरकार आपले आहे. त्यावेळेस नक्कीच रईस शेख अधिक चांगलं काम करतील. त्यांना सरकारमध्ये महत्वाची जबाबदारी दिली जाईल असं ही बाळ्यामामा म्हणाले. तर रईस शेख हे मंत्री झाले पाहीजेत असं आपल्याला वाटतं असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यावेळी म्हणाले. समाजवादी पार्टी महाविकास आघाडीत आहे. त्यांच्या प्रचारासाठी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आले होते.