तुतारी पिपाणी कन्फ्युजनवर उल्हासनगरच्या उमेदवाराची नामी शक्कल; मतविभाजनाची डोकेदुखी टळली!

पण काहीही असलं, तरी ओमी कलानी यांच्या या आयडियाची उल्हासनगरात मोठी चर्चा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
उल्हासनगर:

निनाद करमरकर, प्रतिनिधी

राज्यात सध्या अनेक ठिकाणी तुतारी आणि पिपाणी यात कन्फ्युजन आहे. पण उल्हासनगरातील (Ulhasnagar Assembly Election) तुतारीचे उमेदवार ओमी पप्पू कलानी यांनी मात्र यावर नामी शक्कल लढवलीये. कलानी यांनी त्यांच्याच एका जवळच्या कार्यकर्त्याला अपक्ष म्हणून उभं केलं असून त्याने पिपाणी चिन्ह घेतलंय. त्यामुळं मतविभाजनाची डोकेदुखी टाळण्यासाठी कलानी यांनी लढवलेली ही शक्कल चर्चेचा विषय ठरली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ओमी पप्पू कलानी हे उल्हासनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. तुतारी वाजवणारा माणूस हे त्यांचं चिन्ह आहे. पण कलानी यांना अडचणीत आणण्यासाठी उल्हासनगर शहरातले काही इच्छुक अपक्ष उमेदवारी भरून पिपाणी चिन्ह घेण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण कलानी यांना लागली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच जवळचा कार्यकर्ता, माजी नगरसेवक मनोज लासी यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवत पिपाणी चिन्हाची मागणी केली. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Malbar Hill Assembly- मलबार हिलमध्ये रंगणार भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत सामना, लोढांपुढे भेरूलाल चौधरींचे आव्हान

यातही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मनोज लासी हे मन्नू सयानी नावाने निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांचं कागदोपत्री नाव मन्नू सयानी असंच असून ते लासी समाजाचे असल्यानं मनोज लासी नावानं प्रचलित आहेत. त्यामुळं अनेक दिवस पिपाणी चिन्हावर लढणारा हा मन्नू सयानी कोण आहे? हेच लोकांना उमगलं नव्हतं. पण ऍफिडेव्हीटवर असलेल्या फोटोवरून गंगाधर ही शक्तिमान है, हे सिद्ध झालंय. याबाबत कलानी गटातील अंतर्गत सुत्रांकडून माहिती घेतली असता, लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळं बसलेला फटका, उल्हासनगरात काही जणांनी पिपाणीवर लढण्याची केलेली तयारी, त्यामुळे होणारे डॅमेज टाळण्यासाठी कलानी यांनी ही युक्ती लढवल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, अजूनही मन्नू सयानी कोण आहे, हे बऱ्याच लोकांना माहीत नसून त्यामुळं मनोज लासी हे खुलेआमपणे ओमी पप्पू कलानी यांचा प्रचार करतायत. एक अपक्ष उमेदवार दुसऱ्या एका पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याची बहुधा राज्यातली ही पहिलीच घटना असावी. पण काहीही असलं, तरी ओमी कलानी यांच्या या आयडियाची उल्हासनगरात मोठी चर्चा आहे.
 

Advertisement