दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या मलबार हिल मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील लढत ही रंगतदार ठरताना दिसते आहे. उच्चभ्रू नागरिकांप्रमाणेच इथे मराठी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. महाराष्ट्राच्या सत्तेच्या नाड्या ज्या नेतेमंडळींच्या हातात असतात, त्यातील प्रमुख नेत्यांची शासकीय निवासस्थाने याच मतदारसंघात येतात. ज्यात मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे शासकीय निवासस्थान देखील आहे. इथले विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा यांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. शिवसेनेत फूट पडली आणि शिवसेनेचे दोन गट तयार झाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने इथून भेरूलाल चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.
कॉस्मोपॉलिटीन मतदारसंघ
मलबार हिल मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटिन मतदारसंघ म्हणता येईल. उच्चभ्रू इमारतींपासून ते खोताची वाडी सारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या चाळी तसंच गिरगाव, अल्ट्रामाऊंट रोड, नाना चौक असे विविध भाग या मतदारसंघात येतात. वेगवेगळ्या जातीचे-धर्माचे लोकं या मतदारसंघात मोडतात. मराठी,गुजराती, जैन, मुस्लिम नागरीक या मतदारसंघातील नागरीक आहे. मलबार हिल मतदार संघात पिण्याच्या पाण्यापासून ते पार्किंगपर्यंत बऱ्याच समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून दिले जात आहे. शिवसेना भाजपची युती असताना हा मतदारसंघ भाजपकडे आला होता. तेव्हापासून या मतदारसंघावर लोढांनी आपली पकड मजबूत केली होती.
या मतदारसंघातील विविध समीकरणे ओळखत उद्धव ठाकरे यांनी भेरूलाल चौधरी यांना उमेदवारी देण्याचे ठरवले.भेरूलाल चौधरी हे पेशाने वकील आहेत. सॉलिसिटर म्हणून काम करणारे भेरूलाल हे राजकारणात नवे आहेत मात्र त्यांची नाळ शिवसेनेशी जोडलेली आहे. मंगलप्रभात लोढा यांच्या काळात शिवसैनिकांना स्वतःचा हक्काचा उमेदवार या मतदारसंघात नव्हता. यावेळी उद्धव ठाकरेंनी ही कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे इथली लढत ही रंगतदार ठरत आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मंगलप्रभात लोढांनी शिवसेनेच्या अरूण दुधवडकर यांना तब्बल 68,686 मतांनी पराभूत केलं होतं. लोढा यांना 97,818 तर दुधवडकर यांना 29,132 इतकी मतं मिळाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मंगलप्रभात लोढांनी काँग्रेसच्या हिरा देवासी यांना तब्बल 71,872 मतांनी पराभूत केलं. लोढा यांना 93,538 तर देवासी यांना 21,666 इतकी मतं मिळाली होती. लोढा यांनी आपले मताधिक्य सातत्याने वाढवत नेले आहे, त्यामुळे भेरूलाल चौधरी यांच्यासाठी इथली लढत सोपी नाहीये. त्यामुळे त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे.हा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबईत शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली होती. या मतदारसंघातून शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला होता. सावंतांनी जाधव यांना 52 हजार 673 मतांनी पराभूत केले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world