लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान आज (सोमवार, 13 मे) रोजी होत आहे. आत्तापर्यंत तीन टप्प्यांचं मतदान झालं असून आणखी तीन टप्प्यांचं मतदान बाकी आहे. सत्तारुढ तसंच विरोधी पक्षांकडून एकमेकांवर होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपाचा पारा वाढलाय. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 370 जागा मिळवेल, आणि राष्ट्रीय लोकशाही दल (NDA) 400 पेक्षा जास्त जागा मिळवेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्यानं करण्यात येत आहे. या निवडणुकीत NDA 400 पेक्षा जास्त जागा कशा मिळवणार? याचं उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलंय. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत NDTV ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी दिलं आहे. त्याचबरोबर 'हा पेपर सेट-पेपर काय म्हणता? तुमचा पेपरच सेट नाही,' असा टोला त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावलाय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले गृहमंत्री?
या लोकसभा निवडणुकीनंतर 400 पेक्षा जास्त जागा एनडीएला मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सशक्त सरकार स्थापन करतील, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केलाय. दक्षिण भारतामधील कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र, केरळ या पाच राज्यांमध्ये भाजपाला सर्वात जास्त जागा मिळतील. या पाचही राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, असा दावा शाह यांनी केला.
( नक्की वाचा : भाजपाच्या घटनेनुसार पंतप्रधान मोदी रिटायर होणार? अमित शाहांनी दिलं उत्तर )
राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर
एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राज्य घटनेत बदल होईल, आरक्षण समाप्त होईल, असा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून केला जातोय. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या आरोपांनाही उत्तर दिलंय. 'राहुल गांधी सार्वजनिक आयुष्यात आले तेंव्हापासून त्यांनी काँग्रेसची प्रमुख धोरणं बनवली आहेत. ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. तेव्हापासून खोटं बोलणं, जोरानं बोलणे आणि सार्वजनिक पातळीवर सतत बोलणे हे प्रकार ते करत आहेत. मोदीजी 2 वेळा पंतप्रधान झाले. दोन्ही वेळा एनडीएला दोन तृतीयांश बहुमत होतं. भाजपाला राज्यघटनेत बदल करुन आरक्षण समाप्त करायचं असतं तर कोण अडवू शकत होतं? असा प्रश्न त्यांनी विचारला.
'आपल्या देशात आरक्षणामुळे कितीतरी दलित मुलं आयएएस बनले, आयपीएस बनले, राज्य सरकारच्या सेवांमध्ये आले, डॉक्टर झाले, इंजिनिअर झाले, अण्विक शास्त्रज्ञ झाले हे त्यांना माहिती नाही. देशातील प्रत्येक व्यक्तीला संधी मिळेल ही तरतूद राज्यघटनेत करण्यात आली आहे. दलित समाजातून पुढं आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर किती मोठे व्यक्ती हे त्यांना माहिती नाही. बाबू जगजीवनराम संपूर्ण देशाचं नेतृत्त्व करत होते. आज संसदेत दलित, आदिवासी, ओबीसी समाजाची संख्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे. त्यांना देश कसा चालतो याबाबत काहीही माहिती नाही. काय पेपर सेट होतात हे माहिती नाही. तुमचा पेपर नीट सेट झालेला नाही, असा टोला अमित शहांनी यावेळी लगावला.