Vidhan Parishad Election Result : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर फॉर्मात आलेल्या महाविकास आघाडीला विधानपरिषदेच्या निवडणुकीत धक्का बसलाय. शुक्रवारी (12 जुलै) रोजी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे तब्बल 12 मतं फुटली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमधील फूट उघड झाली आहे.
दिग्गज उमेदवाराचा पराभव
शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे विधान परिषदेतीमधील ज्येष्ठ आमदार होते. त्यांना पाच टर्म आमदारकीचा अनुभव होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं त्यांना पाठिंबा दिला होता. जयंत पाटील आणि शरद पवार या दोन अनुभवी नेत्यांच्या कौशल्याच्या जोरावर महाविकास आघाडीचे तीन्ही उमेदवार विजयी होतील, असं मानलं जात होतं. पण, प्रत्यक्षात महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले. तर अनुभवी जयंत पाटील यांचा पराभव झाला.
( नक्की वाचा : विधानपरिषद निवडणुकीत 'फडणवीस पॅटर्न' कायम, शरद पवार-ठाकरेंना दिला धोबीपछाड )
काँग्रेसला मोठा धक्का
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे 37 आमदार आहेत. या संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होणार हे निश्चित होतं. त्या प्रमाणे काँग्रेसच्या प्रज्ञा राजीव सातव विजयी झाल्या. पण, काँग्रेसकडं तब्बल 14 अतिरिक्त मतं होती. ही सर्व मतं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळणं अपेक्षित होतं. पण, प्रत्यक्षात काँग्रेसची 6 मत फुटली असल्याचं मानलं जातंय.
विधान परिषद निवडणुकीला सुरुवात होण्याच्या काही तास आगोदर काँग्रेसमधून फुटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसचे चार आमदार फुटण्याची भीती व्यक्त केली होती. ज्याचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला, ज्याचा नवरा अजित पवारसोबत गेला. एक टोपीवाला आहे. आंध्र-नांदेड बॉर्डरवरचा एक आहे, हे चार डाऊटफूल आहेत, असं गोरंट्याल यांनी कुणाचंही नाव न घेता सांगितलं होतं.
गोरंट्याल यांच्या जाहीर इशाऱ्यानंतरही काँग्रेसनं सावधगिरी बाळगली नसल्याचं या निकालावरुन स्पष्ट झालंय. कारण, काँग्रेसची तब्बल 6 मतं फुटल्याचा अंदाज आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या पराभवानंतर पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असं जाहीर केलंय. यावेळेस बदमाश लोकं सापडले आहेत. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असं पटोले यांनी स्पष्ट केलं. पक्षाची मतं फुटल्याची जाहीर कबुलीच काँग्रेसनं यामधून दिली आहे.
( नक्की वाचा : Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं पावणेपाच वर्षांनी कमबॅक, विधानपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय )
इतर पक्षांनाही धक्का
काँग्रेस पक्षाप्रणाणेच महाविकास आघाडीतील इतर पक्षांनाही धक्का बसलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. पण, त्यांच्या पक्षाचीही ही दोन मत फुटली असल्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची चार मतं फुटल्याचा अंदाज आहे.
जयंत पाटील यांना विजयी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फिल्डिंग लावली होती. पवारांनी स्वत: मैदानात उतरुन बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. पण, पवारांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची मतं फोडण्याची शक्यताही खरी झाली नाही. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीचा हा निकाल शरद पवारांनाही धक्का आहे.