विश्वजीत कदम,हे वाघच आहेत,आणि संजय राऊतांना वाघ बाहेर कसे शिकार करतो, हे कदाचित माहित नसावं, त्यांनी एखाद्या चॅनलची डॉक्युमेंटरी बघावी, कारण वाघ संधी बघून झडप घालतो. असं वक्तव्य सांगलीचे काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी केलं आहे. त्यात त्यांनी एकीकडे विश्वजीत कदम यांना वाघ म्हणत त्यांचे कौतूक केले आहे तर दुसरीकडे त्यांनी संजय राऊत यांना चिमटा काढला आहे. त्यामुळे विश्वजीत कदम नक्की कोणाच्या बाजूने आहेत याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विशाल पाटील थेट बोलले
विश्वजीत कदम हे काँग्रेसचे भविष्य आहेत. अशा शब्दात विशाल पाटील यांनी कदम यांचे कौतूक केले आहे. पण विश्वजित कदम यांना नाहक बदनाम करण्याचे आणि घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्याचबरोबर सांगली लोकसभेत वारं फिरलं नाही तर वाऱ्याचे आता वादळ झाले आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील विशाल पाटलांनी व्यक्त केला आहे. दरम्यान विश्वजीत कदम वाघ आहेत की नाहीत ते 4 जूनला समजेल असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्याला विशाल पाटील यांनी उत्तर दिले आहे.
हेही वाचा - 'त्या' बॅनरची सोलापुरात एकच चर्चा, अपक्ष उमेदवाराची भन्नाट शक्कल
विश्वजीत कदम काय म्हणाले होते?
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीत सभा झाली होती. यासभेला उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती होती. यावेळी विश्वजीत कदम यांनी तुम्ही महाराष्ट्राचे वाघ आहात पण मी सांगलीचा वाघ आहे असे वक्तव्य केले होते. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी कदम हे कमालीचे आग्रही होते. मात्र ती जागा काँग्रेसला सुटली नाही. शेवटी विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
हेही वाचा - शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी, जनता नेत्यासोबत की अभिनेत्यासोबत?
'वाघ आहे की नाही समजेल'
विश्वजीत कदम यांनी वाघ असल्याचे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी कदम यांना टोला लगावताना तुम्ही खरे वाघ आहात की नाही ते 4 जूनला समजेल. त्यासाठी कदम यांना चंद्रहार पाटील यांना विजयी करावं लागेल. त्यानंतर या वाघाचा आम्ही सत्कार करू असे राऊत म्हणाले होते. शिवाय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील हे सर्व जण वाघ आहेत. त्यांना आपण जपलं पाहीजे असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत विशाल पाटील यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे विश्वजीत कदम यांच्याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.