केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरल्यानंतर त्यांनी NDTV शी खास बातचित केली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी बोलताना विरोधकांचे सर्व आरोप निराधार असून आम्ही आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं स्पष्ट केलं. बहुमताचा दुरुपयोग करण्याची परंपरा फक्त काँग्रेसची आहे. इंदिरा गांधी यांनी बहुमताचा गैरवापर अणीबाणी लादण्यासाठी केला होता, अशी आठवण त्यांनी करुन दिली.
2014 साली देखील 'ते' बहुमत होतं
काँग्रेसकडून भाजपावर वारंवार राज्यघटना बदलण्याचा आरोप करण्यात येतोय. अमित शाह यांनी भाजपा असं कधीही करणार नाही आणि करु देणार नाही, असं स्पष्टीकरण दिलं. 'विरोधी पक्ष राज्यघटना बदलण्याच्या मुद्याला आरक्षणाशी जोडून प्रचार करत आहे. आमच्याकडं 2014 साली देखील राज्यघटना बदलण्यासाठी पूर्ण बहुमत होतं. तसंच 2019 सालीही पूर्ण बहुमत होतं. गेल्या 10 वर्षांपासून नरेंद्र मोदी सरकारकडं पूर्ण बहुमत आहे. पण, आम्ही कधीही आरक्षणाला धक्का लावलेला नाही.'
'अब की बार 400 पार', होणार का? NDTV च्या पोल ऑफ पोल्सची आकडेवारी काय सांगते?
आरक्षणाला धक्का लावला नाही आणि...
अमित शाह यांनी पुढं सांगितलं, ' आमह्ही कधीही आरक्षणाला धक्का लावलेला नाही. तसंच तो कुणालाही लावू देणार नाही. ही आमची देशाच्या नागरिकांशी कटिबद्धता आहे. मोदीजींनी मागसवर्गीय, दलित, आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी सर्वात जास्त काम केलंय. आम्ही कलम 370 रद्द करण्यासाठी, ट्रिपल तलाक रद्द करत मुस्लिमांना न्याय देण्यासाठी बहुमताचा उपयोग केलाय. बहुमताचा वापर करुन सीएए कायदा लागू करत विदेशात अन्याय होत असलेल्या नागरिकांना न्याय दिला आहे. आम्ही बहुमताचा उपयोग कुणाचं आरक्षण हिसकावून घेण्यासाठी केलेला नाही.
आरक्षणावर हल्ला करताना अमित शाह यांनी सांगितलं की, 'बहुमताचा गैरवापर करण्याची फक्त काँग्रेस पक्षाची परंपरा आहे. इंदिरा गांधी यांनी बहुमताचा गैरवापर अणीबाणी लागू करण्यासाठी केला होता. लोकशाहीचा गळा दाबण्यासाठी केला होता. तर आम्ही संपूर्ण लोकशाही माध्यमातून देशातील महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी बहुमताचा वापर केलाय. लोकांना सर्व माहिती आहे. विरोधकांकडं कोणता मुद्दा नाही. त्यामुळे ते या पद्धतीचे आरोप करत आहेत. नागरिकांवर याचा प्रभाव पडेल, असं मला वाटत नाही.'
'ED चांगलं काम करतेय'; पंतप्रधान मोदींनी अंमलबजावणी संचालनालयाची थोपटली पाठ
राहुल गांधींनी देशाला सांगावं...
इव्हीएमशी छेडछाड आणि इलेक्टोरल बॉन्ड़चा मुद्दा विरोधकांकडून सध्या मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे. अमित शाह यांनी या आरोपांवरही उत्तर दिलंय. 'त्यांच्या पक्षानंही इलेक्ट्रोरल बॉन्ड घेतले आहे. त्यांनी जबरदस्तीनं वसुली केली आहे का? ज्या राज्यात यांचं सरकार होतं तिथं त्यांना इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून पैसे मिळाले आहेत. राहुल गांधींनी देशाला सांगावं की ते जबरदस्तीनं पैसे वसूल करत आहेत. विरोधक चुकीचे आरोप करत आहेत, आमच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नाही. '
अमित शाह म्हणाले की, ' गेल्या 23 वर्षात नरेंद्र मोदी यांनी चारआणेचाही भ्रष्टाचार केलेला नाही. जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा प्रचार केला जात आहे. ते यामध्ये यशस्वी होणार नाहीत. पंतप्रधान मोदींवर देशभरातील नागरिकांचं प्रेम आहे. सर्व जाती, वर्ग आणि वयोगटातील नागरिक मोदींना मत देण्यासाठी उत्सुक आहेत.