Public Holiday : मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास कर्मचाऱ्यांनी काय करावं? BMC ने संपर्क क्रमांक केला जारी

मुंबई महानगरपालिकेने १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.  मात्र यावेळी जी आस्थापनं कर्मचाऱ्यांना सुट्टी देणार नाही, त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Public holiday on polling day in Mumbai : राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यभरातील २९ महानगरपालिका निवडणुकीत मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी असेल. यादरम्यान मतदान देण्यास अडचण येऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.  मात्र यावेळी जी आस्थापनं कर्मचाऱ्यांना सुट्टी देणार नाही, त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुटी लागू राहील. तसेच महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुटी लागू राहणार आहे. 

नक्की वाचा - Dry day in Maharashtra : महाराष्ट्रात सलग 3 दिवस ड्राय डे; कधीपासून मद्यविक्री बंद होणार?

१५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर...

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्यांतील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स , रिटेलर्स यांना सार्वजनिक सुटी लागू असेल. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत द्यावी लागणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांनी याबाबतचा अध्‍यादेश निर्गमित केला आहे. ही सार्वजनिक सुटी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे.

Advertisement

मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास काय कराल? 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांनी मतदानाच्यादिवशी सुटी किंवा सवलत न दिल्यास दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल. यासाठी मुंबई शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे यांसाठी दक्षता पथक नेमण्यात आले आहेत. १५ जानेवारी रोजी तुम्हाला सुट्टी न मिळाल्यास कर्मचाऱ्यांनी दूरध्वनी क्रमांक – ९१२२-३१५३३१८७ यावर संपर्क साधावा आणि आपली तक्रार सांगावी, असं आवाहन पालिकेतर्फे  करण्यात आलं आहे. 

    

Topics mentioned in this article