विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आयुष्यातील जुन्या घटनेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. खरगे यांनी निवडणूक सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भाषा दहशतवाद्यांसारखी आहे, अशी टीका केली होती. योगींनी त्यावर पलटवार केला. योगींनी अमरावतीमधील अचलपूरमध्ये झालेल्या सभेत हैदरबादचे निजाम आणि रझाकरांनी तुमच्या कुटुंबावर केलेले अत्याचार विसरला का? असा प्रश्न खरगे यांना विचारला.
मल्लिकार्जुन खरगे 7 वर्षांचे होते, त्यावेळी ही घटना घडली होती. सध्या काँग्रेस अध्यक्ष बनलेल्या खरगेंच्या डोळ्यासमोर त्यांची आई आणि बहिणीची निजामांच्या सैन्यानं हत्या केली होती. तो इतिहास काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
( नक्की वाचा : '.... तर हिंदूंच्या जमिनी घेतल्या जातील', योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा )
काय म्हणाले योगी?
मल्लिकार्जुन खरगे 7 वर्षांचे होते त्यावेळी नेमकं काय घडलं हे समजून घेण्यापूर्वी अचलपूरमधील सभेत योगी आदित्यनाथ काय म्हणाले हे समजून घेणं आवश्यक आहे. या सभेत योगींनी खरेंगच्या टीकेला उत्तर दिलं.
CM योगींनी सांगितलं की, ' सध्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विनाकारण माझ्यावर रागावलेले आहेत. खरगेजी माझ्यावर रागवू नका. मी तुमच्या वयाचा आदर करतो. तुम्हाला रागावायचं असेल तर हैदराबादच्या निजामावर रागवा. हैदराबाद निजामाच्या रझाकारांनी तुमचं गाव जाळलं होतं. हिंदूंची हत्या केली. तुमची आई, बहीण आणि कुटुंबीयांनाही जाळलं. हे सत्य देशासमोर ठेवा.'
नेमकं काय घडलं होतं?
मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्येच याबाबतचा इतिहास सांगितला आहे. ही घटना 1948 सालातील आहे. त्यावेळी हैदराबाद संस्थानावनर निजामाचं राज्य होतं. खरगेचं भालकी गाव देखील निजामाच्या ताब्यात होतं. निजामाच्या रझाकार या धर्मांध सैन्य संपूर्ण संस्थानात हिंदूची लुटपाट आणि हत्याकांड करत होते. खरगेंचं भालकी गाव देखील त्यांच्या अत्याचारातून सुटलं नाही.
प्रियांक यांनी त्या मुलाखातीमध्ये सांगितलं की, माझे आजोबा त्यावेळी शेतामध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांच्या शेजाऱ्यांनी आमचं घर रझाकारांनी जाळून टाकलं याची माहिती दिली. रझाकारांनी संपूर्ण गावावर हल्ला केला होता. त्यांच्याकडं चार लाखांचं सैन्य होतं. या सैन्याला कुणीही नेता नव्हता.
घरावर हल्ला झाल्याची माहिती समजताच माझे आजोबा तातडीनं घरी पोहचले. पण, ते फक्त माझ्या वडिलांना वाचवू शकले. माझी आजी आणि काकूंना तिथून बाहेर काढेपर्यंत उशीर झाला होता. त्या आगीत त्यांचा मृत्यू झाला.
( नक्की वाचा : 'बटेंगे तो कटेंगे', काँग्रेस अध्यक्षांनी योगी आदित्यनाथ यांची केली दहशतवाद्याशी तुलना, Video )
कोण होते रझाकार?
हैदराबादच्या निझामानं स्वत:चं राज्य वाचवण्यासाठी पदरी बाळगलेली सशस्त्र सैन्यांची संघटना म्हणजे रझाकार. हैदराबाद संस्थानाची निजामापासून मुक्ती करण्यासाठी संघर्ष करणार्या शेकडो स्वातंत्र्य सैनिकांची रझाकारांनी हत्या केली होती. त्याचबरोबर संस्थानातील हजारो हिंदूंवर अत्याचार केले. त्यांची हत्या केली. त्यांची संपत्ती लुटली.
मजलीस-ए-इत्तेहाद-मुस्लीमन (MIM) या संघटनेच्या अंतर्गत रझाकार समाविष्ट होते. MIM ची 1920 साली स्थापना झाली. ही सुरुवातीला मुस्लीमांची सांस्कृतिक आणि धार्मिक संघटना होती. पण लातूर जिल्ह्यातील औशाचा वकील कासिम रिझवीच्या नेतृत्त्वाखाली या संघटनेचं सशस्त्र दलात रुपांतर झाले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खरगेंचा जीव कसा वाचला?
प्रियांक खरगे यांनी त्या मुलाखतीमध्ये वडिल आणि आजोबांचा जीव कसा वाचला हे सांगितलं. ते म्हणाले, 'माझे वडील आणि आजोबा जीव वाचवण्यासाठी जंगलात लपून बसले. त्यांनी आजोबांच्या भावाकडं जाण्याचा निर्णय घेतला. ते त्यावेळी भारतीय सैन्यात कार्यरत होते आणि पुण्यात तैनात होते. पुण्यात त्यांना भेटण्यासाठी त्यांनी जवळपास एक आठवडा बैलगाडीनं प्रवास केला. त्यांना भेटल्यानंतर माझे आजोबा पुन्हा गुलबर्गा (सध्याचं नाव कलबुर्गी) इथं परतले. त्यांनी नव्यानं आयुष्य सुरु केलं. याच ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वत:चं शिक्षण पूर्ण केलं.