कल्याण लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण असणार हा सस्पेन्स संपला आहे. त्यामुळे महायुतीकडून श्रीकांत शिंदे आणि महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र यात आता मनसेची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे शिंदेंचं टेन्शन वाढणार की दरेकरांचे जुने हिरोब चुकते केले जाणार याचीच चर्चा या निमित्तानं कल्याण लोकसभेत होत आहे.
राजू पाटील काय म्हणाले?
राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशातच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या वक्तव्यानं एक वेगळीच चर्चा कल्याण लोकसभेते होत आहे. राजू पाटील हे कल्याण ग्रामिणचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची आहे. अशातच त्यांच्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. ज्यांनी आमच्या पक्षाबरोबर गद्दारी केली, त्या गद्दारांना आम्ही मदत करणार नाही. आमच्या भावना आम्ही राज साहेबांना पोहचवू असं आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा- बारामतीतील संघर्षाला मोदी विरूद्ध राहुल रुप देण्याचा फडणवीसांनी प्रयत्न का केला? वाचा प्रमुख कारणे
मनसे आमदाराचा इशारा कोणाला?
शिवसेना ठाकरे गटानं कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची थेट लढत श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर होणार आहे. वैशाली दरेकर त्या मनसेमध्ये होत्या. त्यांनी मनसेकडून निवडणुकही लढवलेली आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांनी राज ठाकरेंच्या मनसेची साथ सोडली. त्यांनी घरवापसी करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता त्या शिवसेना उद्धव ठाकरेंच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत. त्यांनी मनसे सोडल्याचा राग राजू पाटील यांनी त्याचं नाव न घेता व्यक्त केला. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते दरेकर यांचा प्रचार काही झालं तरी करणार नाही असेच संकेत त्यांनी दिले आहेत.
हेही वाचा - काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
मनसेचीही निवडणूक लढण्याची तयारी?
लोकसभा निवडणूक लढायची की नाही याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कोणाला पाठींबा द्यायचा की स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं हे गुलदस्त्यात आहे. असं असलं तरी कोणत्याही क्षणी आदेश आला तर निवडणूक लढण्याची तयारी आहे असं राजू पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज यांच्या गुढीपाडव्याच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा - लहान बाळाची केली जात होती विक्री, किंमत ऐकून हैराण व्हाल
मनसेची मदत कोणाला?
वैशाली दरेकर यांना राजू पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मनसे श्रीकांत शिंदेंना मदत करणार का? हा खरा प्रश्न आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंबरोबर चांगले जुळवून घेतले आहेत. दोघांचे संबधही चांगले आहेत. ही बाब लक्षात घेता मनसेची मत श्रीकांत शिंदेंच्या पारड्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.