50 Years Of Sholay: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट 'शोले' (Sholay Movie) चित्रपट पाहिला नाही असा माणूस भारतामध्ये सापडणं थोडं अवघड आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये गब्बरसिंहला पोलीस पकडून नेतात असं दाखवण्यात आलं आहे. अनेक रसिकांना हा शेवट अजिबात आवडला नव्हता. ठाकूरने गब्बर सिंहला ठार मारायला हवं होतं अशी भावना अनेक प्रेक्षकांची होती. चित्रपट निर्मात्यांनाही तसेच वाटत होते मात्र आणीबाणीमुळे तसे दाखवता आले नव्हते. 'शोले' चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचे पुतणे, शहजाद सिप्पी यांनी घोषणा केली आहे की, 'शोले' एका नव्या रुपात प्रेक्षकांपुढे आणण्यात येणार आहे. यामध्ये 6 मिनिटांची अतिरिक्त दृश्ये दाखवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये गब्बर सिंगचा मृत्यू हा ठाकूरच्याच हातून होताना दाखवण्यात येणार आहे.
(नक्की वाचा: 'शोले'साठी अमजद खान यांना डायलॉगफेक शिकवल्याचा सचिन पिळगावकर यांचा दावा, जितेंद्र आव्हाड म्हणतात...)
1975 साली प्रदर्शित झालेल्या मूळ 'शोले' चित्रपटात, संजीव कुमार यांनी साकारलेल्या ठाकूरच्या भूमिकेत गब्बरला ठार मारून आपला सूड उगवताना दाखवले होते. मात्र, आणीबाणीच्या (Emergency in India) काळात सेन्सॉर बोर्डाने या दृश्यात बदल केले होते. त्यावेळी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात, ठाकूर जखमी गब्बरला सोडून देतो आणि पोलीस त्याला अटक करतात, असे दाखवले होते. शहजाद सिप्पी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, "1975 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती. त्यावेळी सेन्सॉर बोर्डाने तीन-चार दृश्यांना कात्री लावली होती. या दृश्यांमध्ये गब्बर सिंगला ठाकूर ठार मारतो या दृश्याचाही समावेश होता. या चित्रपटामध्ये ठाकूर एक निवृत्त पोलीस अधिकारी दाखवण्यात आला असून तो सामान्य नागरीक म्हणून जीवन जगत असतो. सामान्य नागरिकाने कायदा हातात घेतलेला दाखवणे योग्य नाही असे सेन्सॉर बोर्डाचे म्हणणे होते. यामुळे या दृश्याला कात्री लावण्यात आली होती.
(नक्की वाचा:शोलेचे 5 भन्नाट किस्से! चित्रपटाच्या शूटिंगला अडीच वर्षे का लागली, तुम्हाला माहित आहे का?)
शोले चित्रपट प्रदर्शित होऊन 50 वर्षे झाली असून या चित्रपटातून वगळण्यात आलेली काही दृश्ये पुन्हा जोडून नव्याने हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. इटलीतील बोलोग्ना येथील 'सिनेमा रेट्रोव्हेटो फेस्टिव्हल' मूळ दृश्ये असलेला 'शोले' चित्रपट दाखवण्यात येणार आहे. शोले चित्रपट 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झाला होता. 2025 मध्ये दाखवण्यात येणारा 'शोले' चित्रपट मूळ चित्रपटापेक्षा 6 मिनिटे मोठा आहे. मूळ चित्रपटातून वगळलेली आणि आता पुन्हा समाविष्ट केलेली इतर दृश्ये कोणती आहेत याबद्दलची उत्सुकता वाढावी यासाठी त्याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
(नक्की वाचा: शोलेतील सांभाची मुलगी दिसते इतकी सुंदर, पाहा फोटोज)
'शोले'ला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 27 जून रोजी इटलीतील पियाझा मॅगिओर इथे विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि जया बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील जय, वीरू, बसंती आणि ठाकूर यांसारखी लोकप्रिय पात्रे, तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित खलनायकांपैकी एक असलेला गब्बर सिंग, त्याचे संवांद आणि ॲक्शन दृश्यांमुळे हा चित्रपट प्रचंड गाजला होता.
फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि सिप्पी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडने तीन वर्ष अथक परिश्रम घेत नवीन आवृत्तीवर काम केले आहे. 'शोले'ची नवीन आवृत्ती चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.