Soham Bandekar Kelvan: महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. सुचित्रा आणि आदेश यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच विवाहबंधनामध्ये अडकणार आहे. सोहम बांदेकर स्टार प्रवाह चॅनेलवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतील मंजिरी म्हणजे अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्न करणार असल्याची माहिती समोर आली होती. पण अद्याप अधिकृतरित्या या माहितीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. पण बांदेकरांच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झालीय.
सोहमच्या लाडक्या मावश्या आणि मामाने केले केळवणाचे आयोजन
दादरच्या आस्वाद हॉटेलमध्ये पारंपरिक पद्धतीने केळवण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री सुकन्या मोने, पूर्वा गोखले, शिल्पा नवलकर आणि अभिजीत केळकर यांनी सर्वांनी मिळून केळवण सोहळ्याचे आयोजन केले होते. आस्वाद हॉटेलच्या सोशल मीडियावर हँडलवर या सोहळ्याचे फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत.
केळवणाला पंचपक्वन्नांचा खास बेत
अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांनी सोहळ्याबाबत सांगितले की, सोहम बांदेकर... सुचित्रा आणि आदेश बांदेकर ह्यांचा मुलगा. लवकरच हसत हसत आनंदाने लग्नबंधनात अडकणार आहे म्हणून त्याच्या सगळ्या मावश्या सुकन्या, पूर्वा, शिल्पा (ऋजुताची कमतरता जाणवली) आणि अभिजित मामाने त्याचे केळवण केले आणि पारंपरिक, सात्विक केळवण 'आस्वाद' शिवाय दुसरीकडे कुठे होऊच शकत नाही. आल्याआल्या फुलांच्या पायघड्या घातल्या. पेढा आणि चाफ्याच्या फुलांनी त्यांचे स्वागत केलं... नंतर औक्षण केलं... छान ताटाभोवती मोत्याची महिरप घातली तिघांच्या... ( हे सगळ आस्वादनेच आम्हाला दिले आम्हाला घरून काहीही न्यावे लागलं नाही) नंतर वडा आणि कोथिंबीर वडीने सुरुवात झाली. पंचपक्वान्न होती जेवणाला... खरवस, दुधी हलवा, बासुंदी, श्रीखंड आणि मोदक बाकी 3 भाज्या, कढी, मसाले भात, पुऱ्या, कोशिंबीर, ताक, कुरडई असे पोटभर जेऊन त्यांना आहेर दिला आणि समाधानाने आपापल्या घरी गेलो.
सोहम बांदेकरच्या केळवणाचा असा सुंदर बेत आखण्यात आला होता. सोहमचे लग्न कधी होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी आणि नवऱ्या मुलीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.
(नक्की वाचा: Suraj Chavan: सुरज चव्हाणचं केळवण, बस्ता अन् दागिने खरेदी, सोबत कोण होतं? पाहा भन्नाट Video)