Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराची आरोपींनी तीन वेळा रेकी केली आणि यानंतर रविवारी (16 एप्रिल 2024) त्याच्या घराबाहेर गोळीबार केला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना गुजरातमधील भूज परिसरातून अटक केली. या आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांना चौकशीदरम्यान खळबळजनक माहिती मिळाली. रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर दोन बाईकस्वारांनी गोळीबार केला. पाच वेळा त्यांनी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. पण पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
आरोपींना पकडण्यासाठी तयार केली 12 पथके
मुंबई क्राइम ब्रांचचे सह-पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, "आता या प्रकरणामध्ये कलम 120B देखील जोडण्यात आले आहे. आरोपींना अटक करण्यासाठी क्राइम ब्रांचने एकूण 12 पथक तयार केले होते. आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पाठवण्यात आले. आरोपींकडे हत्यारे होती, त्यामुळे भूज पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. मंगळवारी (16 एप्रिल) सकाळी विमानाने आरोपींना मुंबईमध्ये आणले गेले. यानंतर न्यायालयाने आरोपींना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर पाल यापूर्वी दोन वर्षांकरिता हरियाणामध्ये काम करत होता. याचदरम्यान सागर बिश्नोई गँगच्या संपर्कामध्ये आला असावा, असा संशय पोलिसांना आहे.
पनवेलमध्ये राहत होते आरोपी
आरोपींना पनवेलमध्ये भाडेतत्त्वावर घर घेतले होते. यासाठी घराचे भाडे 35 हजार रुपये होते आणि त्यांनी 10 हजार रुपये डिपॉझिट भरल्याचेही पोलिसांनी सांगितले.