
चित्रपटसृष्टी आणि मालिका क्षेत्रातील मोठं नाव अभिनेता मुकुल देव याचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी त्याने शेवटचा श्वास घेतला. अद्याप त्याच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही. मात्र त्याच्या अचानक झालेल्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आयएएनएसने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सन ऑफ सरदार, आर राजकुमार, जय हो यासांरख्या चित्रपटातील त्याच्या भूमिका अजरामर आहेत. नुकताच त्याचा भाऊ राहुल देव याच्या अंत द एंड या चित्रपटात त्याने भूमिका साकारली होती.
मुकुल देव याचा जन्म नवी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला होता. त्याच्या कुटुंबाचं मूळ जलंदर येथील असल्याचं सांगितलं जातं. मुकुल देव याचे वडील हरी देव हे सहाय्यक पोलीस आयुक्त होते. त्याच्या वडिलांचं पास्टो आणि पर्शियन या भाषांवर प्रभूत्व होतं. वडिलांचा मुकुलवर मोठा प्रभाव होता.
मुकुल देवने 1996 मध्ये मुमकीन या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेत त्याने विजय पांडेची भूमिका साकारली होती. याशिवाय मुकुलने एक से बढकर एक या विनोदी मालिकेतही भूमिका साकरली होती. मुकुलने फिअर फॅक्टरचा पहिला सिजन होस्ट केला होता. दस्तक हा त्याचा पहिला चित्रपट. यामध्ये त्याने एसीपी रोहित मन्होत्राचं काम वठवलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world