Priya Marathe Death News: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचे 31 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. कॅन्सर आजाराविरोधात लढताना तिची झुंज अपयशी ठरली अन् वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी प्रियाने या जगाचा निरोप घेतला. प्रिया आपल्यात नाही, यावर अजूनही तिच्या जवळच्या माणसांप्रमाणेच चाहत्यांनाही विश्वास बसत नाहीय. यादरम्यान प्रियाचा चुलत भाऊ आणि अभिनेता सुबोध भावेने 'लोकमत फ्लिमी'या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आठवणींना उजळा देत भरभरुन कौतुक केलंय. नेमके काय म्हणालाय सुबोध भावे जाणून घेऊया सविस्तर...
तिचे असे जाणे भयंकर धक्कादायक : सुबोध भावे
सर्वात पहिल्यांदा तिचे असे अकस्मात निघून जाणे सर्वांसाठीच भयंकर धक्कादायक आहे. पण तिची आई, तिचा पती शंतनू आणि तिचा मोठा भाऊ विवेक यांच्यासाठी ते जास्त धक्कादायक असेल कारण त्यांच्यासोबत तिचा सर्वात जास्त सहवास होता. दुर्दैवाने तिचे वडील म्हणजे माझा काका प्रिया लहान असतानाच गेला. सुहास काका घरी येतो म्हणजे आमच्या घरी चैतन्य असायचे. कारण इतका खेळकर, खूप उत्साही, प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन काम करणारा आणि मल्टिडायमेन्शनल असा सुहास काका होता. त्याने आयुष्यात अनेक व्यवसाय केले. ठाण्यामध्ये त्याने "प्रिया कॉफी हाऊस" देखील सुरू केले होते. प्रिया सुद्धा तशीच होती आणि त्याचेच गुण प्रियामध्ये आले होते,असे मला वाटायचं.
प्रिया मराठे खऱ्या आयुष्यात कशी होती?
"प्रिया लहानपणापासूनच उत्साही, माणसांमध्ये रमणारी, समजून घेणारी, प्रत्येकाशी प्रेमाने वागणारी होती. जो माणूस तिच्या आयुष्यात आला तो कधीच तिच्यापासून तुटला नाही. लोकांनी इतके प्रियाबद्दल भरभरून लिहिलंय, इतकं प्रेम लोक तिच्यावर करत होते, तिचा भाऊ आणि सहकलाकार म्हणून मला तिचा प्रचंड अभिमान आहे. तिच्या आजारपणाच्या काळात माझी काकु आणि शंतनू यांनी तिला खूप जपलं, खूप सांभाळलं" असेही सुबोधने सांगितलं.
प्रिया मराठेसोबतचा सेटवरचा अनुभवही सुबोध भावेनं सांगितला
माझ्या नशिबाने प्रियासोबत चार कामं करता आली. "कळत नकळत" या मालिकेमध्ये आम्ही दोघांनी पहिल्यांदा काम केलं, ज्यामध्ये माझी नकारात्मक भूमिका होती. या मालिकेमध्ये प्रियाच्या मागे लागून मी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढतो, फसवतो असे ते पात्रं होतं. ती पहिल्यांदा सेटवर आली तेव्हा मी तिला विचारलं, "प्रिया तू का घेतला असशील हा रोल?" ती म्हटली, "दादा आपलं काम आपण चोखपणे करूया. आपलं भावाबहिणीचं नातं आपण या कॅरेक्टरमध्ये नको आणुया". 'तू भेटशी नव्याने' मालिकेमध्येही आम्ही काम केलं आणि तिला सेटवर पाहून इतका आनंद झाला होता. कारण त्याआधी तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. तेव्हा त्या आजारातून ती बाहेर आली होती. मग तिने नाटकाचे प्रयोग सुरू केले. परदेशात वगैरे दौरे केले. तेव्हा मालिकेमध्ये तिला पाहून इतके बरं वाटलं, कारण ती ताजीतवानी दिसत होती. प्रिया दिसायला अत्यंत सुंदर असताना तिनं खलनायिकाच्या भूमिकाही उत्तमरित्या साकारल्या. मी सेटवर जायचो, माझं खूप वेळ पाठांतर होत नसे. प्रिया सेटवर यायची तिचा सगळ्याचा सगळा सीन पाठ असायचा", हे सांगताना प्रियाचा खूप अभिमान असल्याचीही भावना सुबोधने व्यक्त केली.
"मराठी सिनेमांकडून प्रियाची दखल घेतली गेली नाही..."
कायमच आपल्याला अनेक उत्तम अभिनेत्याबाबत वाटतं की त्यांना डिर्झव्हिंग गोष्ट मिळाली नाही. मराठी सिनेमांनी प्रियाची दखल ज्या पद्धतीने घ्यायली हवी होती तितक्या प्रमाणात घेतली नाही. दिसायला अतिशय गोड आणि त्यापेक्षाही तिचं काम उत्तम होते. अत्यंत प्रामाणिकपणे, मनापासून काम करणारी होती, असे म्हणत सुबोधने खंत व्यक्त केली.
(नक्की वाचा: Priya Marathe Shantanu Moghe: आता मी आलोय! प्रिया मराठेचा पती शंतनु मोघेची या लोकप्रिय मालिकेत एण्ट्री, पाहा VIDEO)
तिला पुन्हा कुठेतरी पाहेन असं वाटत होतं, पण...
"काही काही माणसं आजारपणाने विझतात किंवा जिवंतपणे मेलेली असतात. पण प्रियाला मी तसे कधीच पाहिलेले नाही, तशी ती माझ्या आठवणतीच नाहीय. स्मिता तळवलकर, रसिका जोशी आणि प्रिया या माझ्या आयुष्यात मी तीन बायका अशा पाहिल्या आहेत, ज्या खऱ्या अर्थाने फायटर होत्या. सर्व गोष्टींमधून या तडफेने-ऊर्जेने त्या पुन्हा आल्या. यादरम्यान गेल्याच वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा आजार बळावल्याने प्रिया काम करत नाहीय हे समजलं. मधेमधे मी तिला मेसेज/फोन करत होतो. पण तिने कधीच कोणाला भेटू दिलं नाही. अशा अवस्थेमध्ये जवळच्या लोकांनी पाहावं, अशी तिची इच्छा नसावी. पण मी शंतनूच्या संपर्कात होतो. प्रियालाही मेसेज करत होतो पण ती नीट उत्तर देत नव्हती, तेव्हा लक्षात आलं की तिला फार आजाराविषयी बोलायचं नाहीय आणि त्याचं रडगाणंही कधी ती गायली नाही. मला वाटत होतं मी तिला पुन्हा कुठेतरी पाहेन आणि मी त्या फोनची वाट पाहत होतो की दादा मी आता पुन्हा काम करायला सुरुवात केलीय, पण शेवटी त्या कॅन्सरने तिचा घास घेतला", हे सांगताना सुबोध भावे अतिशय भावुक झाला होता.
शंतनू आणि प्रिया मराठेचे नाते कसे होते?शंतनूचा खूप अभिमान वाटतो असे म्हणत सुबोध म्हणाला की,"शंतनूसारखा उत्तम माणूस तिच्या आयुष्यात नवरा म्हणून आला. त्या दोघांचा तेरा-चौदा वर्षांचा एकत्र प्रवास आहे. त्या दोघांचे एकमेकांवर इतकं विलक्षण प्रेम होतं. खूप केलं त्या पोराने, इतकं कोणी करत नाही. आताच्या काळामध्ये आपण दोन तीन महिन्यात लोकांचे घटस्फोट झाल्याचं ऐकतो. अशा काळात या आजारपणामध्ये तो ज्या ठामपणे प्रियासोबत उभा राहिला. स्वतःचं काम सोडून त्यानं स्वतःच्या आयुष्यातला संपूर्ण वेळ प्रियाला दिला. शंतनूने जे नवीन काम हाती घेतले होते, त्याचा पहिला एपिसोड प्रिया जाण्याच्या आदल्या दिवशी टेलिकास्ट झाला होता. मला असं वाटतं तो एपिसोड प्रियाने पाहिला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आई आणि त्याच्यासमोरच अखेरचा श्वास घेतला. दोघांनी एकमेकांवर वेड्यासारखे प्रेम केले. मला खात्री आहे की ते पुन्हा कोणत्यातरी स्वरुपात एकमेकांसमोर येतील, तेव्हाही ते एकमेकांचेच असतील, इतकं त्यांचे नाते सुंदर होते".