Prajakta Gaikwad : 'स्वराज्य रक्षक संभाजी' या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता लवकरच प्राजक्ता तिच्या खऱ्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. तिचा नुकताच शंभुराज खुटवडे यांच्यासोबत साखरपुडा पार पडला असून, लवकरच ते दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.
राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या लग्न जुळण्याचा हटके आणि फिल्मी किस्सा सांगितला आहे. प्राजक्ता म्हणाली की, ज्याला मी नेहमी दादा म्हणायचे त्याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र दादा म्हणायचा भन्नाट किस्सा प्राजक्ताने सर्वांसोबत शेअर केला.
(नक्की वाचा- 'चल, उठ, निघ! लग्नाची बोलणी करायला आलेल्या गौरव मोरेला तेजश्री प्रधानने हाकलले)
प्राजक्ताने सांगितले की, शंभुराजसोबतची तिची पहिली भेट अगदी फिल्मी होती. एका चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना तिची रात्रीची शिफ्ट होती. शिफ्ट आटोपून घरी निघाली असताना अचानक तिच्या गाडीसमोर एक ट्रक आला आणि धडकला. या घटनेमुळे ती खूप घाबरली आणि रागाच्या भरात तिने ट्रक चालकाशी वाद घालत त्याच्या मालकाला बोलावण्यास सांगितले.
प्राजक्ता पुढे म्हणाली, "ते खरंच खूप फिल्मी होतं. मात्र ड्रायव्हर थोडा विचित्र बोलू लागला. पण, त्याच वेळी शंभुराज तिथे आले आणि त्यांनी सगळी परिस्थिती सांभाळून घेतली." त्यानंतर त्या दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. प्राजक्ताने पुढे सांगितले, "शंभुराजनं मला कधीच 'ताई' म्हणून हाक मारली नाही. मात्र मी त्याला 'दादा' म्हणायचे, पण तो मला नेहमी 'मॅडम'च म्हणायचा."
मैत्रीचे रूपांतर प्रेमात
अपघाताच्या निमित्ताने सुरू झालेली प्राजक्ता आणि शंभुराज यांची ही भेट नंतर मैत्रीत बदलली आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सुरुवातीला प्राजक्ताने शंभुराजच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला होता. पण, नंतर शंभुराजने तिचे मन जिंकले आणि प्राजक्ताने अखेर त्याला होकार दिला. "माझ्या वयाच्या 18 व्या वर्षानंतर मला लग्नासाठी स्थळं यायला सुरुवात झाली होती. पण, मला आधी डिग्री पूर्ण करायची होती," असंही प्राजक्ताने सांगितलं. प्राजक्ताच्या या फिल्मी लव्हस्टोरीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.