amitabh bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वयाच्या ८३ व्या वर्षीही आपल्या कामाप्रती असलेली ओढ आणि शिस्तीसाठी ओळखले जातात. सहा दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या बिग बींनी नुकतच एका ब्लॉगद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, जर एखाद्या दिवशी त्यांच्याकडे काम नसेल किंवा ठरलेले वेळापत्रक पाळलं गेलं नाही तर त्यांना खूप अस्वस्थ वाटतं.

अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगमध्ये नेमकं काय आहे?
अमिताभ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, एखादा दिवस जो पूर्णपणे 'आळसात' गेला. त्या दिवसात काहीच घडलं नाही. पण काम नसणं मला अस्वस्थ करतं. जेव्हा तुम्ही रोजच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार काम करत नाही, तेव्हा सवयीची ती संपूर्ण साखळी तुटते आणि तो दिवस एक प्रकारचं रहस्य बनतो.
त्यांनी पुढे म्हटलंय, माणसाच्या मनात असा विचार येतो की, आजचा दिवस आपल्याला हवा तसा का जात नाहीये? जर आपल्या मनात थोडी जरी समज असेल, तर आपल्या आजूबाजूला शांतता आणि आनंदी वातावरण असावं असं वाटतं. पण काही लोकांच्या बाबतीत असं कधीच घडत नाही आणि हीच चिंतेची बाब असते. चिंतेत जगणं हे शरीर आणि मन दोघांसाठीही हानिकारक आहे. बिग बींना दररोज काम करण्याचं व्यसन आहे जणू, असं त्यांच्या या पोस्टवरुन स्पष्ट होतं.

काही काळापूर्वी 'कौन बनेगा करोडपती'च्या १७ व्या सीझनचा समारोप झाला. त्यावेळी प्रेक्षकांचा निरोप घेताना अमिताभ बच्चन अत्यंत भावुक झाले होते. त्यांनी म्हटलं होतं की, त्यांच्या आयुष्यातील एक तृतीयांश पेक्षा जास्त काळ त्यांनी प्रेक्षकांसोबत घालवला आहे, जे त्यांच्यासाठी खूप मोठे भाग्य आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world