Huma Qureshi's Brother Murder: बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची दिल्लीत हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निजामुद्दीन भागातील जांगपुरा भोगल लेनमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली. पार्किंगच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
गुरूवारी रात्री उशिरा पार्किंगवरून आसिफ कुरेशीचा काही लोकांसोबत वाद झाला. हा वाद इतका वाढला की, काही अज्ञात व्यक्तींनी आसिफवर हल्ला केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 11 वाजता आसिफच्या घराबाहेर एका व्यक्तीने आपली स्कूटर पार्क केली होती. आसिफने ती स्कूटर बाजूला घेण्यास सांगितले असता, त्यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की, आरोपींनी आसिफवर हल्ला केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. आसिफ शेख या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या आसिफ कुरेशी यांच्या हत्येचा गुन्हा निजामुद्दीन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Wardha Crime: ड्रग्ज तस्करीसाठी 2 महिन्यांच्या बाळाचा वापर; 16 लाखांचे MD ड्रग्ज जप्त)
पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली
या गंभीर प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी हत्येमध्ये वापरण्यात आलेले हत्यार देखील जप्त केले आहे. तसेच, या प्रकरणाच्या तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.