
निलेश बंगाले, वर्धा
Wardha Crime News : वर्ध्यात ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन महिन्यांच्या बाळाचा वापर करून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या मुंबईच्या दोन महिलांसह एकूण 5 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 400 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि एक पिस्तूल जप्त केले असून, एकूण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नागपूर विभागात ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
बाळाचा वापर करून ड्रग्जची तस्करी
वर्धा स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून दोन महिला वर्ध्यात ड्रग्जचा पुरवठा करत होत्या. या महिलांनी ड्रग्ज तस्करीसाठी एक धक्कादायक शक्कल लढवली होती. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्या आपल्या सोबत दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन प्रवास करत होत्या. यामुळे पोलिसांना तपास करणे कठीण जात होते.
(नक्की वाचा : Kalyan News : म्हाडाच्या प्रकल्पावरुन कल्याणमध्ये महायुतीत चांगलीच जुंपली, आजी-माजी आमदार आमने-सामने )
या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी वर्धा स्थानिक गुन्हे शाखा गेल्या तीन महिन्यांपासून या आरोपींच्या मागावर होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये मुंबईच्या दोन महिलांसोबत वर्ध्यातील तीन आरोपींचा समावेश आहे.
16 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून 400 ग्रॅम एमडी ड्रग्ज, ज्याची किंमत सुमारे 16 लाख रुपये आहे, जप्त केली आहे. यासोबतच त्यांच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे, ज्यामुळे ड्रग्ज रॅकेटमध्ये शस्त्रास्त्रांचाही वापर होत असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी या कारवाईबद्दल अधिक माहिती दिली.
या पाचही आरोपींना 7 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 11 ऑगस्टपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या रॅकेटमधील इतर साथीदारांचाही शोध घेतला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world