अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' दणक्यात सुरुवात केली आहे. चित्रपट गुरुवारी, 5 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सिनेमाचे कलाकार आणि इतर टीम आनंदात असताना अल्लू अर्जुन अडचणीत सापडला आहे. पुष्पा 2 च्या रिलीजच्या दिवशी अल्लू अर्जुन हैदराबादमधील एका सिनेमागृहात पोहोचला होता, जिथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
हैदराबादमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमियर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, त्याच्या सुरक्षा टीम आणि सिनेमा हॉल व्यवस्थापनाची नावे देखील या प्रकरणात समाविष्ट आहेत. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रीमियर शोवेळी गर्दी जमली होती. या गर्दीत अडकल्यानंतर रेवती नावाच्या महिलेचा गुदमरल्याने मृत्यू झाला. त्यांच्या 13 वर्षाच्या मुलालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Pushpa 2 : रिलीजपूर्वी पुष्पा 2 ने दिला चाहत्यांना धोका, काय आहे कारण; जाणून घ्या)
हैदराबादचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांनी याबाबत म्हटलं की, अल्लू अर्जुन थिएटरमध्ये येणार असल्याची कोणतीही माहिती थिएटर व्यवस्थापन किंवा कलाकारांच्या टीमने दिलेली नव्हती. थिएटर व्यवस्थापनाने प्रीमियर शोसाठीची पूर्वसूचना देणे गरजेचं होतं. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद न केल्याचा आरोप अभिनेत्याशिवाय संध्या थिएटरच्या व्यवस्थापनावरही आहे.
नक्की वाचा - 'पुष्पा 2' चित्रपटाचा नवा रेकॉर्ड; तिकिटाची किंमत चक्क 3000च्या घरात!
अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी जेव्हा शेकडो लोक कॅम्पसमध्ये आले, तेव्हा त्याच्या सुरक्षा पथकाने गर्दीला ढकलण्यास सुरुवात केली, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. यामध्ये रेवती आणि तिच्या मुलाला गुदमरल्यासारखे वाटले. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना गर्दीतून बाहेर काढले आणि सीपीआर दिला आणि त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिथे महिलेला मृत घोषित केले.
पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थिएटरमधील गोंधळाच्या परिस्थितीला जबाबदार असलेल्या सर्वांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.