Dharmendra Asthi Visarjan: सिनेसृष्टीचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या अस्थींचे उत्तराखंडातील हरिद्वार येथे गंगा घाटावर विसर्जन करण्यात आले. अस्थी विसर्जनाचा विधी बुधवारी (3 डिसेंबर 2025) पार पडला. धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जन विधीसाठी सनी देओल आणि बॉबी देओल आपल्या मुलांसह हरिद्वार येथे दाखल झाले होते. सनी देओलने वडिलांच्या अंत्यसंस्काराप्रमाणेच त्यांच्या अस्थी विसर्जनाचा विधी देखील गुप्तपणे पार पडला. या कार्यक्रमाबाबतही प्रसिद्धी माध्यमांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. सनी आणि बॉबीने आपल्या मुलांसह हरिद्वार येथील श्रवण नाथनगर येथील हॉटेलच्या परिसरातील घाटावर धर्मेंद्र यांच्या अस्थीचे विसर्जन केले. यादरम्यान धर्मेंद्र यांची मुलं आणि नातवंड भावुक झाल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय. NDTV या व्हिडीओची पुष्टी करत नाही.
धर्मेंद्र यांच्या अस्थी गंगा घाटावर विसर्जित
दिवसभर हरिद्वार गंगेच्या व्हीआयपी घाटावर माध्यमांची गर्दी होती, पण नियोजित कार्यक्रमानुसार व्हीआयपी गेटला कुलूप लावण्यात आले होते. माध्यमांसह कोणालाही येथे प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. अस्थी विसर्जन विधीच्या वेळेस पोलिसांनी देओल कुटुंबाला सुरक्षाव्यवस्था पुरवली आणि या विधीच्या गोपनीयतेचीही काळजी घेतली. चाहत्यांपेक्षाही माध्यमांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन करून कुटुंबीय घरीही पोहोचले आहेत.
(नक्की वाचा: Dharmendra: धर्मेंद्र यांच्या डुप्लिकेटला पाहून चाहते झाले भावुक, व्हिडीओ होतोय व्हायरल)
(नक्की वाचा: Dharmendra News: धर्मेंद्र यांनी फक्त 1.5 कोटीमध्ये खरेदी केला होता जुहूतील बंगला, आताची किंमत ऐकून बसेल धक्का)
धर्मेंद्र यांच्या निधनानं देशाला धक्का
धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऑक्टोबर महिनाअखेरीस त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांच्या निधनाच्याही अफवा पसरल्या होत्या. यावेळेस सनी देओलने मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. हेमा मालिनींसह ईशा देओलनंही सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणाऱ्यांना फटकारलं होते. 12 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला, घरामध्ये उपचार सुरू होते. औषधोपचार सुरू असतानाच राहत्या घरी धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.