- धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाही?
- धर्मेंद्र यांचे अंतिम दर्शन का घेऊ दिले नाही? चाहत्यांचा प्रश्न
- धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत इतकी गुप्तता का पाळली? : चाहते
Dharmendra Death: जवळपास सहा दशकं सिनेसृष्टी गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी या जगाचा निरोप घेतला. वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं निधन झालं. धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर मुंबईतील पवनहंस स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा मुलगा सनी देओलने त्यांना मुख्नानी दिला. धर्मेंद्र यांच्या अंत्ययात्रेत देओल कुटुंबासह अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, अभिषेक बच्चन यासारखे कित्येक दिग्गज सेलिब्रिटी सहभागी झाले होते. पण इतक्या मोठ्या सेलिब्रिटीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का करण्यात आले नाही, त्यांना शेवटचा निरोप का देता आला नाही, यासह असंख्य प्रश्नांची उत्तरं त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायची आहेत.
आवडत्या कलाकाराला शेवटचा निरोप देता न आल्यानं चाहत्यांनी दुःख केले व्यक्त
NDTVशी बातचित करताना एका चाहत्याने म्हटलं की, धर्मेंद्र यांचे पार्थिव घराबाहेर अशा एका ठिकाणी ठेवायला पाहिजे होते जेथे सर्वजण महानायकाचं अंतिम दर्शन घेऊ शकले असते. दुसऱ्या चाहत्याने म्हटलं की, धर्मेंद्र यांना शेवटचे पाहू शकलो नाही याचं दुःख कायम राहील.
धर्मेंद्र कायम आमच्या हृदयात जीवंत राहतील, अशी प्रतिक्रिया त्यांच्या जबरा फॅनने दिलीय. त्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हायला हवे होते, अशाही भावना एका चाहत्याने व्यक्त केल्या.
काही लोकांकडे व्यक्त होण्यासाठी शब्द नव्हते तर काहींना जवळचा माणूस निघून गेल्याचे वाटतंय.
धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त देशवासीयांना तसेच मीडियाला का देण्यात आली नाही, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. इतकंच नव्हे तर कुटुंबीयांकडून त्यांच्या निधनाची माहिती अधिकृतरित्या सांगण्यात आली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. इतक्या मोठ्या महानायकाला अशा पद्धतीने शेवटचा निरोप देण्यात आल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे प्रोटोकॉल काय असतात?
साधारणतः एखाद्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या प्रक्रियेसाठी सरकारला माहिती देणे किंवा पुष्टी करण्याच्या प्रोटोकॉलचा समावेश असतो. पण हे केवळ कुटुंबाने दिलेल्या माहिती अवलंबून नसते तर कोणत्याही सेलिब्रिटीच्या मृत्यूचे वृत्त सार्वजनिक झाल्यावरही शासन स्वतःही त्वरित निर्णय घेऊन तयारी करते.
MHA, CMO किंवा राज्य सरकारचे गृह मंत्रालय घेतं निर्णय
कुटुंबातील सदस्य किंवा त्यांचे प्रतिनिधी प्रोटोकॉलनुसार थेट मुख्यमंत्री कार्यालय (CMO) किंवा केंद्रीय गृह मंत्रालय (MHA) यांना कळवतात. मृत्यूची बातमी मिळताच मृत व्यक्ती शासकीय इतमामास पात्र आहे की नाही, मुख्यमंत्री कार्यालय किंवा गृह मंत्रालय निश्चित करते. हा निर्णय सामाजिक जीवनातील योगदान आणि पदाच्या आधारावर घेतला जातो.
आदेशानंतर सुरू केली जाते तयारी
निर्णयानंतर सरकारतर्फे त्वरित एक अधिकृत आदेश, अधिसूचना जारी केली जाते. त्यानंतर स्थानिक जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी आणि पोलिसांना शासकीय इतमामासाठी तिरंगा, गार्ड ऑफ ऑनर आणि शोक सलामीचे निर्देश दिले जातात.
कुटुंबाची परवानगी आवश्यक
जर कुटुंबाने अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाणाशी संबंधित सरकारच्या सहभागास सहमती दिली तरच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. याबाबतचे निर्णय पूर्णपणे केंद्रीय गृह मंत्रालय किंवा संबंधित राज्य सरकारवर अवलंबून असतात, याबाबत कोणताही निश्चित कायदा नाही.
(नक्की वाचा: Dharmendra Hema Love Story: धर्मेंद्र आणि हेमा मालिनींचे 9 रोमँटिक फोटो, प्रत्येक फोटोत दिसेल फक्त अफाट प्रेम)
मृत्यूनंतर त्वरित जारी केला जातो सरकारी आदेशमुख्यमंत्री किंवा राज्य सरकारतर्फे अंत्यसंस्काराच्या काही तास आधी किंवा सहसा मृत्यूनंतर लगेचच अधिकृतरित्या अधिसूचना जारी केली जाते.
धर्मेंद्र यांच्या प्रकरणात नेमके काय झालं?धर्मेंद्र यांच्या प्रकरणात निधनाची माहिती कुटुंबीयांनी गुप्त ठेवून लगेचच अंत्यसंस्काराची तयार केली. धर्मेंद्र यांच्या कुटुंबाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारे अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
24 नोव्हेंबर 2025 रोजी काय घडलं?
- 24 नोव्हेंबर रोजी 11.40 वाजता धर्मेंद्र यांच्या घरी हालचाली वाढल्या.
- 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.40 वाजण्याच्या सुमारास धर्मेंद्र यांच्या घराबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली.
- दुपारी 12:50 वाजता रुग्णवाहिका धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाहून थेट पवनहंस स्मशानभूमीकडे निघाली.
- जवळपास दुपारी 1:20 वाजता धर्मेंद्र यांना मुखाग्नी देण्यात आला.
- यादरम्यान दुपारी 1.10 वाजण्याच्या सुमारास IANS वृत्तसंस्थेने धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती दिली.
- प्रसिद्धी माध्यमांना कळेपर्यंत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून कुटुंबीय घरी परतत होते.