Dharmendra Video: बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून कुटुंबीयांसह चाहतेही अजून सावरू शकलेले नाहीत. नुकतेच हेमा मालिनी यांनी नवी दिल्ली येथे धर्मेंद्र यांच्यासाठी शोकसभेचे आयोजन केले होते. यानंतर ईशा देओलने इन्स्टाग्रामवर धर्मेंद्र यांचा खास व्हिडीओ शेअर करून त्यांना श्रद्धांजली अर्पित केलीय. व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांच्या खासगी जीवनासह मोठ्या पडद्यावरील प्रवासाची झलक पाहायला मिळतेय.
त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या शानदार भूमिकांच्या आठवणी चाहत्यांच्या मनात आजही कायम आहेत. दुसरीकडे देओल कुटुंबातील त्यांच्या भूमिका म्हणजे वडिलांपासून ते आजोबांपर्यंतचे त्यांनी निभावलेल्या नात्याचंही दर्शन यामध्ये दिसतंय. धर्मेंद्र यांनी आपल्या मुलामुलींसह घालवलेले खास क्षण, नातवंडांसोबतचे फोटोही पाहायला मिळत आहेत. एका कार्यक्रमात दिलीप कुमारही त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत.
(नक्की वाचा: Hema Malini Dharmendra Love Story: हेमा मालिनींसाठी काही पण... शुटिंगपूर्वीच उंच टाकीवर चढेल धर्मेंद्र, अन्...)
दोन्ही कुटुंबीयांसोबत धर्मेंद्र यांचे खास फोटो-व्हिडीओ
शिवाय ईशा देओलच्या व्हिडीओमध्ये सनी देओल, बॉबी देओल दोन बहिणींसह त्यांच्या आई प्रकाश कौर यांच्या फोटोंचा समावेश आहे.
(नक्की वाचा: Dharmendra News: आपणा सर्वांचे लाडके धरम... धर्मेंद्र यांच्या निधनाच्या 14 दिवसांनंतर बॉबीने शेअर केली खास पोस्ट)
हेमा मालिनी यांना अश्रू अनावर
दरम्यान नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत हेमा मालिनी यांनी मुली अहाना आणि ईशासह धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. हेमा मालिनी म्हणाल्या की, "ज्या व्यक्तीसोबत मी सिनेमांमध्ये प्रेमाचा अभिनय केला. तेच माझे जीवनसाथी झाले. आमचे प्रेम खरं होतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची आमच्यामध्ये हिंमत होती. आमचे लग्न झालं आणि ते एक चांगले पती होते, ते माझा आधार होते आणि माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणी त्यांनी मला साथ दिली". धर्मेंद्र यांच्याबाबत भावना व्यक्त करताना हेमा मालिनींना अश्रू अनावर झाले होते.