Dharmendra News: ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठी आजही चाहत्यांच्या मनात एक खास जागा आहे. 1960 मध्ये जेव्हा या देखण्या हिरोने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं, तेव्हा त्यांच्या दमदार लुक आणि आवाजाने लाखो लोकांना वेड लावलं. एका नवख्या कलाकारापासून ते अनुभवी अभिनेत्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेक्षकांना खूप भावला.
पण तुम्हाला हे माहीत आहे का, की पंजाबमधील या साध्या-भोळ्या तरुणाने कधीच विचार केला नव्हता की सहा दशकांनंतरही तो प्रेक्षकांचा इतका लाडका स्टार असेल? खरं तर, त्यांनी आपली पहिली कार एका खास 'बॅकअप प्लॅन'चा भाग म्हणून खरेदी केली होती. इंडस्ट्रीत करिअर अयशस्वी झालं, तर आयुष्याचा गाडा पुढे कसा न्यायचा, याची तयारी त्यांनी तेव्हाच करून ठेवली होती!
लहान शहरातून बॉलिवूडचा प्रवास
धर्मेंद्र यांचा जन्म लुधियाना जिल्ह्यातील नसराली येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नाव धर्मेंद्र केवळ कृष्ण देओल आहे. 1948 मध्ये वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा 'शहीद' हा चित्रपट पाहिला. याचवेळी त्यांनी सुपरस्टार दिलीप कुमार यांच्यासारखं स्टार बनण्याचं स्वप्न पाहिलं. त्यांना तेव्हाच कळलं होतं की आयुष्यात नेमकं काय करायचं आहे.
( नक्की वाचा : Dharmendra Net Worth: धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती किती? 100 एकर जागेत बनवलंय फार्म हाऊस, वाचा सर्व डिटेल्स )
एका जुन्या मुलाखतीत धर्मेंद्र यांनी याबद्दल बोलताना सांगितलं होतं की, ते दिलीप कुमार आणि इतर कलाकारांना पाहायचे, तेव्हा त्यांच्या मनात सतत एकच विचार यायचा, "ही सुंदर माणसं कुठून आली आहेत? मलाही त्यांच्यात असायला हवं. मी तर त्यांच्यातच आहे." आणि झालंही तसंच, धर्मेंद्र बॉलिवूडमध्ये सुपरस्टार म्हणून उदयास आले.
काय होता 'प्लॅन बी'?
बॉलिवूडचे 'ही-मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांच्याकडे त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अपयश आलं तर काय करायचं, याचा एक ठोस 'बॅकअप प्लॅन' तयार होता. त्यांनी त्यांची पहिली कार याच विचाराने खरेदी केली होती. त्यांनी ठरवलं होतं की इंडस्ट्रीत काम मिळणं बंद झालं, तर ते टॅक्सी ड्रायव्हर बनतील!
( नक्की वाचा : Dharmendra धर्मेंद्र यांच्या आयुष्यातील तिसरी महिला; 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते 'ही-मॅन' )
सुदैवाने, प्रेक्षकांच्या प्रचंड प्रेमामुळे धर्मेंद्र यांना कधीही हा पर्याय निवडण्याची गरज पडली नाही आणि ते इंडस्ट्रीच्या टॉपवर कायम राहिले.
या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या पहिल्या कारबद्दलचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, "जेव्हा मी इंडस्ट्रीत थोडं चांगलं काम करू लागलो आणि मला चांगली फी (पैसे) मिळू लागली, तेव्हा मी माझी पहिली कार फिएट (Fiat) खरेदी केली."
"माझ्या भावाला, अजितला, मात्र माझी निवड आवडली नाही. तो म्हणाला, 'पाजी, तुम्ही एक चांगली, छत उघडं असलेली कार घेऊ शकत होतात, शेवटी तुम्ही हिरो आहात.' मी त्याला उत्तर दिलं, 'आपण या इंडस्ट्रीवर पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही. उद्या कदाचित मला काम मिळणार नाही. परिस्थिती बिघडली, तर निदान माझ्याकडे ही फिएट तर असेल, जिचं मी टॅक्सीमध्ये रूपांतर करून माझा उदरनिर्वाह करू शकेन.''
बॉक्स ऑफिस हिट्सची मालिका
धर्मेंद्र यांचा अभिनय प्रवास जबरदस्त आहे. त्यांनी अनेक बॉक्स-ऑफिस हिट चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात फूल और पत्थर (1966), ममता (1966), अनुपमा (1966), आणि आए दिन बहार के (1966) यांचा समावेश आहे.
1968 मध्ये तर त्यांच्या नशिबाने पुन्हा एक मोठी कलाटणी घेतली. या वर्षी त्यांनी शिखर, आँखें, इज्जत आणि मेरे हमदम मेरे दोस्त यांसारखे अनेक यशस्वी चित्रपट दिले. या चित्रपटांमुळे बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक म्हणून त्यांचं स्थान निश्चित झालं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world