Dhurandhar box office collection Day 3: अभिनेता रणवीर सिंह याचा बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांतच जबरदस्त कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगने अचानक गती गमावल्याची चर्चा होती. मात्र पहिल्या वीकेंडचे कलेक्शन पाहून या चर्चा खोट्या ठरल्या आहेत.
धुरंधरची भारतात कमाई
सैकनिल्क (Sacnilk) च्या अंदाजानुसार, 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटाने भारतात निव्वळ कलेक्शन 99.50 कोटी रुपये केले आहे. याचा अर्थ हा चित्रपट 100 कोटी रुपयांच्या कमाईच्या अगदी जवळ पोहोचला आहे. चित्रपटाने ग्रॉस कलेक्शनमध्ये 119 कोटी रुपयांचा आकडा सहज पार केला आहे.
दिवसनिहाय कमाई
- शुक्रवार - 28 कोटी रुपये
- शनिवार - 32 कोटी रुपये
- रविवार - 39.50 कोटी रुपये
धुरंधरचे जगभरातील कलेक्शन
'धुरंधर' चित्रपटाने परदेशातही जोरदार कमाई केली आहे. परदेशातून चित्रपटाने 30 कोटी रुपयांहून अधिक ग्रॉस कलेक्शन मिळवले आहे. यामध्ये एकट्या नॉर्थ अमेरिकेतून सुमारे17 कोटी रुपये कलेक्शन आले आहे. यामुळे 'धुरंधर' हा अमेरिका बॉक्स ऑफिसवर नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. एकूणच, या चित्रपटाचे तीन दिवसांतील जागतिक ग्रॉस कलेक्शन 140 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहे.
रणवीरच्या करिअरमधील मोठा टप्पा
'धुरंधर' रणवीर सिंहच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे. या चित्रपटाने 'पद्मावत' आणि 'सिम्बा' सारख्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. इतकंच नव्हे तर, केवळ तीन दिवसांत 'धुरंधर'ने रणवीरच्या जुन्या सुपरहिट चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकले आहे. ज्यात 'दिल धडकने दो' (76.81 कोटी) आणि 'गुंडे' (78.61 कोटी) यांचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world