Govinda News: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा खासगी जीवनामुळे चर्चेत आहे. गोविंदाचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या गोष्टी सोशल मीडियावर ऐकायला मिळत आहेत. यावर खुद्द गोविंदाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. अभिनेता गोविंदाने (Govinda) पत्नी सुनीता अहुजासोबतच्या वैवाहिक आयुष्याबाबत पसरत असलेल्या अफवांदरम्यान स्वतःविरुद्ध सुरू असलेल्या कटातून वाचण्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे म्हटलंय. मागील काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात तणाव सुरू असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. अलीकडेच सुनीता अहुजा यांचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला होता, ज्यात त्यांनी पतीच्या कथित अफेअरबाबत प्रतिक्रिया दिली होती.
मी देवाकडे प्रार्थना करतोय की... : गोविंदा
यादरम्यान गोविंदाने ANIला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की,"दौलत आणि प्रसिद्धी कोणालाच सोडत नाही आणि अशा कटकारस्थानांचा सामना सर्वांनाच करावा लागतो,असं नाही. मला एक फार प्रसिद्ध अभिनेता माहिती आहे, जो अशाच प्रकारच्या गोष्टीचा बळी ठरला होता आणि आता माझ्याबाबतीतही असंच घडतंय, मी त्यांच्याइतका मोठा नाहीय. मी देवाकडे प्रार्थना करतोय की त्याने मला या संकटातून वाचवावं आणि माझ्या मुलांच्या भल्यासाठीही मी प्रार्थना करतो. मी खूप संघर्ष केलाय." गोविंदाने पुढे सांगितलं की तो धार्मिक स्वभावाचा माणूस आहे आणि आईच्या आशीर्वादाने तो एक साधे जीवन जगतोय.
(नक्की वाचा: Kangana Ranaut: आयुष्य नरक झालं होतं, 10 वर्षांनंतर Hrithik Roshanसोबतच्या कायदेशीर लढाईवर कंगना राणौतची पोस्ट)
कमकुवत समजू नका : गोविंदा
गोविंदाने पुढे असंही म्हटलं की,"आतापर्यंत गप्प राहिल्यामुळे लोक त्यांना कमकुवत समजू लागले होते आणि समाजात त्यांची एक समस्याग्रस्त स्वरुपाची प्रतिमा तयार होत होती. मी काही काळापासून पाहतोय की आपण बोलत नाही तेव्हा लोक आपल्याला एकतर कमकुवत समजतात किंवा आपणच समस्या आहोत असं मानतात. म्हणून आज मी प्रतिक्रिया देतोय. मला सांगण्यात आलं की माझ्या कुटुंबातील लोक नकळत या सर्वात ओढले जाऊ शकतात आणि त्यांना हेही कळणार नाही की त्यांचा वापर एका मोठ्या कटाच्या सुरुवातीच्या टप्प्यात केला जातोय".
"सर्वात आधी याचा परिणाम कुटुंबावर होतो आणि नंतर तो समाजात पसरतो. मी इतकी वर्षं कामापासून दूर आहे. माझ्या चित्रपटांना सध्या बाजार नाही आणि कृपया ही माझी तक्रार किंवा रडगाणं समजू नका. मी स्वतःही अनेक सिनेमे नाकारले आहेत. त्यामुळे मी याबद्दल रडत नाही."
(नक्की वाचा: Bapya Movie: 'बाप्या'ने गाठला जागतिक मंच! पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2026मध्ये अधिकृत निवड)