Dhasal Marathi Movie: दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित 'ढसाळ' या बहुप्रतीक्षित चरित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला असून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती'च्या निमित्ताने या चित्रपटाचे भव्य पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. मुंबईत हजारोंच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 1 ऑक्टोबर 2026 रोजी हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'ढसाळ' सिनेमामध्ये ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून त्यांच्या लुकची प्रभावी झलकही समोर आली आहे. ललित प्रभाकरच्या या भूमिकेकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले असून त्याने साकारलेला ढसाळांचा बंडखोर आणि तडफदार आविष्कार प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
नामदेव ढसाळ यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार
संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत वरुणा मदनलाल राणा निर्मित या चित्रपटात दलित पँथर चळवळीचे प्रणेते, विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या संघर्षमय आणि ज्वलंत जीवनप्रवासाचे वास्तववादी चित्रण पाहायला मिळणार आहे. वरुणा राणा लिखित आणि दिग्दर्शित आणि प्रताप गंगावणे यांच्या प्रभावी संवादांनी सजलेल्या या चित्रपटातून अन्याय आणि शोषणाविरुद्ध नामदेव ढसाळ यांनी उभारलेला लढा, त्यांच्या लेखणीतून पेटलेली क्रांती आणि समाजमनाला हादरवून टाकणारे विचार यांचा ठसा उमटणार आहे. या चित्रपटाला देशातील दिग्गज दाक्षिणात्य संगीतकार इलैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. हिंदी सिनेसृष्टितील प्रसिद्ध गीतकार इर्शाद कामील तसेच मराठीतील गुरु ठाकूर यांनी या चित्रपटाची गाणी लिहिलेली आहेत. या चित्रपटात ललित प्रभाकरचे नामदेव ढसाळाच्या रूपात रूपांतर प्रख्यात रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी केले आहे.
नामदेव ढसाळ म्हणजे प्रक्षोभक विचार: दिग्दर्शिका वरुणा राणा
यावेळी दिग्दर्शिका वरुणा राणा म्हणाल्या,"नामदेव ढसाळ हे केवळ व्यक्तिमत्त्व नव्हे, तर एक प्रक्षोभक विचार आहेत. त्यांच्या जीवनातील संघर्ष, त्यांच्या कवितेतील विद्रोह आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारी त्यांची भूमिका पडद्यावर मांडणे हे मोठे आव्हान आहे. हा चित्रपट केवळ एका कवीची कथा नसून, तो एका चळवळीचा, एका विचारप्रवाहाचा आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याचा दस्तऐवज आहे. 'ढसाळ'च्या माध्यमातून आम्ही त्यांच्या विचारांची ज्वाला आजच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहोत. हा चित्रपट प्रेक्षकांना अस्वस्थ करेल, प्रश्न विचारायला भाग पाडेल आणि कदाचित अंतर्मुखही करेल. ढसाळ हे शब्दांच्या पलीकडचं वादळ होते आणि त्या वादळाचा अनुभव प्रेक्षकांना चित्रपटगृहात घ्यायला मिळणार आहे.”
(नक्की वाचा: Asha Bhosale Granddaughter: आशा भोसलेंची नात आहे बॉलिवूडची सुपरस्टार, 16व्या वर्षीच सलमान खानच्या सिनेमाची ऑफर)
ललित प्रभाकरसाठी हे होते सर्वात मोठे आव्हानआपल्या भूमिकेविषयी ललित प्रभाकर म्हणाला, ही भूमिका मिळाल्यावर सर्वात मोठं आव्हान होतं, नामदेव ढसाळासारखं दिसणं. त्यासाठी दिग्दर्शिका वरुणा राणा आणि रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी अथक प्रयत्न केले.पहिल्या लूक ट्रायलला मल्लिका नामदेव ढसाळ यांनी “अगदी असाच दिसायचा नामदेव!” असं म्हटल्यावर आम्हाला मोठा दिलासा मिळाला. या भूमिकेमुळे त्यांच्या विचारांशी आणि संघर्षाशी अधिक जवळून परिचय झाला. क्रांतिकारी आणि कवी मनाचं हे दुर्मीळ मिश्रण साकारण्याची संधी मिळणं, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.''
रंगभूषाकार श्रीकांत देसाई म्हणाले, ज्या चित्रपटाच्या संहिता मला भावतात त्या नक्की मला करायला आवडतात. जेव्हा मी वरुणा मॅडमना भेटलो त्यावेळी त्यांनी मला संहिता आणि दादांचे जुने फ़ोटोज दाखवले. मुळात वरुणाजींनी 4-5वर्ष ह्या विषयाचा अभ्यास केलाय. असे फार कमी दिग्दर्शक असतात. नामदेव ढसाळांना प्रत्यक्षात उतरवताना आव्हान तर होतेच पण ढसाळ म्हणजेच संघर्ष आणि हा संघर्ष प्रेक्षकांना पहायला नक्की आवडेल.
निर्माते संजय पांडेय म्हणाले,"पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. सोशीत आणि अन्यायाने पीडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पँथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. त्यांचं जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल आहे. महाराष्ट्रच काय संपूर्ण देशात दलित पँथरने एक राजकीय आणि सामाजिक वादळ तयार केलं होतं. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे हे एक निर्माता म्हणून माझं सौभाग्य आहे आणि आव्हान ही आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या सर्व देश विदेशातील चाहत्यांसाठी, विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ही पर्वणी असेल."
घोषणेनंतरपासूनच चर्चेत असलेल्या या चित्रपटाचा प्रवास आता प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पोस्टर आणि प्रदर्शन तारीख जाहीर झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून हा चरित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक महत्त्वपूर्ण ठसा उमटवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world