नुकताच सोशल मीडियावर आमिर खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आमिर एका पक्षाचं समर्थन करताना दिसत आहेत. आता या व्हिडिओवर आमिर खानने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये केलेला दावा फेटाळून लावला आहे. ते कोणत्याही पक्षाचं समर्थन करीत नाहीत आणि हा व्हिडिओ डीपफेक असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणात त्यांनी सायबर सेलमध्ये FIR दाखल केली आहे.
काही वृत्त माध्यमांनुसार, हा व्हिडिओ आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमादरम्यानचा आहे. मात्र AI च्या साहाय्याने त्याच्या आवाजात फेरबदल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
या व्हिडिओमध्ये काय म्हटलंय?
27 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आमिर म्हणतोय की, भारत एक गरीब देश नाही. जर तुम्ही असा विचार करीत असाल तर तो चुकीचा आहे. या देशातील प्रत्येक नागरिक लक्षावधी आहे. प्रत्येक व्यक्तीकडे किमान 15 लाख रूपये असायचं हवेत. काय म्हणालात? तुम्हाला 15 लाख रूपये मिळाले नाहीत. मग तुमचे 15 लाख रूपये कुठे गेले? 'जुमल्यां'पासून सावध राहा, अन्यथा स्वत: नुकसान करून घ्याल.
हे ही वाचा- सलमान खानची सुरक्षा वाढवा, गोळीबारानंतर थेट PM मोदींकडे मागणी
आमिर खानचं स्पष्टीकरण...
आमिर खानच्या टीमकडून या व्हिडिओवर प्रतिक्रिया आली आहे. त्यानुसार, आमिरने मुंबईतील सायबर सेलमध्ये या व्हिडिओविरोधात एफआयआर दाखल केली आहे. आमिरने निवडणूक आयोगाच्या कॅम्पेनच्या माध्यमातून लोकांना मतदानासाठी जागरूक केलं आहे. मात्र त्यांनी आपल्या 35 वर्षांच्या करिअरमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नसल्याचं सांगण्यात आलं. हा फेक व्हिडीओ आहे. याशिवाय सर्वांनी आगामी निवडणुकीत मतदानासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असं आमिरकडून आवाहन करण्यात आलं आहे.
रश्मिका मंदानालाही डीपफेकचा फटका
या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात रश्मिका मंदाना हिचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. रश्मिका मंदानाचा फॅन पेज चालविणाऱ्या एका व्यक्तीनेच हा डीपफेक व्हिडिओ केला होता. बऱ्याच कालापासून फॅन पेज चालवूनही फॉलोअर्स वाढत नसल्या कारणाने त्याने रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडिओ करण्याचं ठरवलं आणि युट्यूबच्या माध्यमातून डीप फेक व्हिडिओ तयार करण्याचा कोर्सही केला. फॉलोअर्स वाढविण्यासाठी त्याने डीप फेक व्हिडिओ केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. हा आरोपी आंध्रप्रदेशचा असून त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.