
2025 हे वर्ष बॉलीवूडच्या काही चित्रपटांसाठी खूप लाभदायक वर्ष ठरले आहे. या वर्षी अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असून दमदार कमाईही केली आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांची प्रमुख भूमिका असलेला 'सैयारा' हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. मात्र खरी धमाल उडवलीय ती 'महावतार नरसिम्हा' ( Mahavatar Narsimha) या ॲनिमेटेड चित्रपटाने. 'महावतार नरसिम्हा' या ॲनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. अश्विन कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या पौराणिक ॲनिमेटेड ॲक्शन ड्रामाने आता 'भूल चूक माफ' (72.73 कोटी) च्या लाइफटाइम कमाईला मागे टाकले आहे. यासोबतच या चित्रटाने 2025 सालच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-10 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
( नक्की वाचा: 'महावतार नरसिम्हा'तील नरसिंहाचा आवाज कोणाचा आहे माहिती आहे का ? )
'महावतार नरसिम्हा'ची डरकाळी
'सैयारा', 'सन ऑफ सरदार' आणि 'धडक 2' यांसारख्या चित्रपटांशी स्पर्धा असूनही, 'महावतार नरसिम्हा'ने 13 दिवसांमध्ये एकूण 112.80 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापैकी एकट्या हिंदी डब व्हर्जनने 83.55 कोटी रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे, इतर भाषांमधील डब आवृत्तीची कमाई हळूहळू कमी होत असताना, हिंदी व्हर्जनची कमाई अजूनही जोरदार सुरू आहे.
( नक्की वाचा: 'महावतार नरसिंम्हा' इतका यशस्वी का झाला? उत्तर तुम्हालाही माहिती आहे )
'महावतार नरसिम्हा'चे पुढचे टार्गेट 'जाट'
'भूल चूक माफ' नंतर 'महावतार नरसिम्हा' सनी देओलचा 'जाट' चित्रपटाला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. जाट चित्रपचाने 88.72 कोटींची कमाई केली असून 2025 च्या हिंदी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या 10 चित्रपटांच्या यादीत 9 व्या क्रमांकावर आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये सध्या फक्त 5 कोटींचा फरक आहे. येत्या एक-दोन दिवसांत 'महावतार नरसिम्हा' जाटला मागे टाकेल अशी शक्यता आहे. विशेषतः, आगामी वीकेंडमध्ये या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर यांचा 'वॉर 2' आणि रजनीकांत यांचा 'कुली' हे चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहेत, त्यामुळे 'महावतार नरसिम्हा'कडे कमाई करण्यासाठी अजून एक आठवडा शिल्लक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world